डॉ. बी. एन. पाटील रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या काळात त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली होती.

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना जळगाव जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे स्वच्छता अभियाना अंतर्गत जलश्री मंत्रालयाचा पुरस्कार, जिल्हा परिषदेत पेपरलेस काम केल्यामुळे कोच पुरस्कार, अमळनेर तालुक्यातील अनोरे येथे केलेल्या कामामुळे जलसंधारण पुरस्कार,माझी वसुंधरा अभियान अंतर्गत केलेल्या कामामुळे महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार मिळाला.

दरम्यान,डॉ. पाटील यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत ऑनलाइन संगणकीकरण काम केले. तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची आँनलाईन हजेरी प्रणाली लागू केली. ज्या गावांना पाणीपुरवठ्याची सोय नव्हती अशा गावांना पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात त्यांना यश आले. अशा विविध प्रकारे त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केली.