मुलाखतीविना पदभरतीच्या यादीतील शिक्षकांचे काय?

यादीतील उमेदवारांवर अन्याय; मुलाखतीद्वारे होणार भरती

रत्नागिरी:- खासगी शैक्षणिक संस्थांना मुलाखतीद्वारे शिक्षकांची भरती करण्यास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे रिक्त राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी शैक्षणिक संस्थांमधील पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु जुन्या निर्णयानुसार मुलाखतीविना पदभरतीच्या प्रसिध्द झालेल्या यादीतील अनेकांना नियुक्त्याच मिळालेल्या नाहीत. त्यांच्यावर या आदेशामुळे अन्याय होणार आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मंजुरी मिळाल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 6100 रिक्तपदे भरणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे रखडलेली भरती आता मार्गी लागणार असल्याने डीएड्, बीएड् धारकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मुलाखतीशिवाय होणार्‍या पदभरतीची पहिली यादी 9 ऑगस्ट 2019 ला जाहीर झाली होती. 9 हजार 128 जणांच्या जाहीर यादीतून 5822 जणांची निवड करण्यात आली. पण प्रत्यक्षात तीन ते साडेतीन हजार उमेदवारच प्रत्यक्ष शाळांमध्ये रुजू झाले. शाळांवर रुजू न झालेले गैरजहजर अपात्र उमेदवार, गणित व विज्ञानचे पात्र शिक्षक न मिळाल्याने रिक्त राहिलेल्या जागा, माजी सैनिकांच्या रिक्त सुमारे 1200 जागा, ब्रिजकोर्सच्या याचिकेमुळे रिक्त राहिलेल्या 1 ते 5 वी पर्यंतच्या 400 जागा अशा एकूण सुमारे साडेतीन हजार जागा पहिल्या यादीनंतर रिक्त राहिल्या आहेत. अभियोग्यता चाचणीत जास्त गुण मिळणार्‍या उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या शाळांवर नोकरी करण्याची संधी मिळेल असे वाटले होते. मात्र मुलाखतीशिवाय होणार्‍या भरतीसाठी पात्र उमेदवार नाहीत असे कारण देत मुलाखतीद्वारे भरती प्रक्रियेसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे अभियोग्यता परीक्षेत चांगले गुण असूनही खासगी संस्थेवर नोकरी करण्याची वेळ अनेकांवर आली आहे.

विनामुलाखतीसह भरती प्रक्रिया करण्याच्या हजारो जागा शिल्लक असताना मुलाखतीसह भरती राबविण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे गुणवत्ता धारकांवर अन्याय होणार आहे. जास्त गुण असणार्‍यांची जिल्हा परिषद शाळांवर निवड होऊ शकते, अशी प्रतिक्रिया कोकण डीएड्, बीएड् धारक संघटनेच्या उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर यांनी दिली आहे.