ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन

रत्नागिरी:- ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, गझलकार अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष व साहित्य क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्त्व सिंधुदुर्गाचे सुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रतिभावंत कवी, गझलकार, साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.

महाराष्ट्रातील अनेक गझल मुशायऱ्यांमध्ये नानिवडेकर सहभागी असत. अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. ‘चांदणे नदीपात्रात’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रचंड गाजला होता. काही काळ त्यांनी दै. पुढारी सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये उपसंपादकपदी काम पाहिले होते. महाराष्ट्र टाईम्स चे सिंधुदुर्ग प्रतिनिधी म्हणून सध्या ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. आपल्या मिश्किल आणि विनोदबुद्धीने त्यांचे सर्व क्षेत्रांत सर्वांशी आपुलकीचे संबंध होते. गझलकार सुरेश भट यांच्या गझलेचा वारसदार म्हणून नानिवडेकर यांना ओळखले जाई. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी नानिवडेकर यांच्या अनेक गझला आपल्या जाहीर कार्यक्रमात सादर केल्या होत्या. त्यांच्या ‘निघावयास नानिवडेकर हरकत नाही’ या गझलेवर तर कैकजण फिदा होत असत. जणू आयुष्याच्या रेषेचे घड्याळ नियतीने पाहिले आणि मधुसूदन नानिवडेकर यांनी निघावयास हरकत नाही, असे म्हणत आपल्या गझलेतील शब्दांप्रमाणेच इहलोकातून एक्झिट घेतल्याची भावना साहित्यप्रेमींतून व्यक्त होत आहे. गझलकार नानिवडेकर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच साहित्यक्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.