सोशल मीडियाद्वारे ३ वर्षांत ५६ जणांना गंडा

१८ बनावट अकाऊंटवर कारवाई

रत्नागिरी:-मागील तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ५६ जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाउंट काढुन २३ जणांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला आहे. त्यांच्या माध्यमातून जनजागृती आणि फसवणुकीच्या प्रकारांना प्रतिबंध करण्यात यश आले आहे. १८ बनावट अकाऊंट सायबर पोलिसांनी बंद करून फसवणूक रोखली आहे. 

कोरोना महामारीच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. टाळेबंदी असल्याने जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहारावर भर देण्यात आला. त्याचा फायदा काही सायबर गुन्हेगार उठवित आहेत. नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांची फसवणूक सुरू आहे. पोलिस, बॅंकांच्या माध्यामातून वर्षानुवर्षे जनजागृती सुरू आहे. तरी नागरिक आमिषाला बळी पडुन फसवणूक करून घेत आहेत. तुमचा मोबाईल नंबर विनर ठरला आहे. तुम्हाला लाखोचे बक्षिस लागले आहे. तुमचा बॅंक खाते क्रंमाक आणि युपीआय कोड द्या, तुमच्या खात्यात बक्षिसाची रक्कम जमा होईल. मी बॅंक मॅनेंजर बोलतोय. तुमच्या एटीएमची मुदत संपली आहे. तुम्हाला दुसरे एटीएम लवकच मिळले, त्यासाठी एटीएम नंबर आणि त्याचा पिन द्या, असे अनेक बहाणे करून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करीत आहेत. पिन नंबर मिळाला की, काही क्षणात त्याच्या खात्यातून रक्कम जाते. आपल्या खात्यातून हजारो रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला की ते जागे होतात. तसेच प्रतिष्ठित लोकांची बनावट फेसबुक अकाऊंट काढुन त्याद्वारे पैसे मागण्याचे प्रकार अधिक घडत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. इंगळे यांचे बनावट अकाऊंड काढुन  पैसे मागण्यात आले होते. व्हॉट्सॲप अकाऊंड देखील हॅक करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत.  

सध्या सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडून अनेकांना गंडा घालणे आणि संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याचे प्रकार वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून फसवणूक झाल्याच्या ५६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी दाखल झाल्यानंतर ७ दिवसांत कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २०१६ पासून स्वतंत्र सायबर सेल सुरू करण्यात आला आहे. सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींची निपटारा करण्यासाठी १ पोलिस अधिकारी व ५ अंमलदारांची टीम आहे. गेल्या तीन वर्षांत ५६ तर सहा महिन्यात सोशल मीडियावरील बनावट अकाउंटच्या २३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत १८ बनावट अकाउंट सायबर पोलिसांना बंद करण्यात यश आले आहे. उरलेल्या ५ तक्रारींवर कारवाई सुरू आहे.