पोषण आहाराचे दिडशे रुपये मिळवण्यासाठी पालकांना हजाराचा भुर्दंड

रत्नागिरी:-महामारीच्या संकटांमध्ये शाळा भरली नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचे धडे सुरू आहेत. या कालावधीमध्ये शालेय पोषण आहार मुलांना थेट देता आला नाही. मात्र उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहाराचे धान्य न देता त्याऐवजी रोख रक्कम देण्यासाठी विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढावे लागणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढण्यासाठी किमान एक हजार रुपये खात्यात भरावे लागणार आहेत. मात्र एक हजार रुपये खर्च करून पालकांच्या हातात फक्त 156 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पालकांना तांदूळ वाटप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोरोनाच्या संकटात शाळेची घंटा वाजलीच नाही. शाळेमध्ये उपस्थिती चांगली राहावी यासाठी मुलांना शालेय पोषण आहार शासनाने सुरू केला. मात्र उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार मुलांना द्यायचा शिल्लक असल्याने आता तो पोषण आहार न देता त्या पोषण आहाराची रक्कम मुलांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे असे संयुक्त खाते काढण्याचे आदेश बजावले आहेत. अगदी काही अल्पावधीतच मुलांची बँक खाती काढण्याचे काम शाळा प्रशासनाला करावे लागणार आहे.

पालकांना याबाबत सांगितले असता पालकांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करून राष्ट्रीयीकृत बँका कोणतीही फुकट खाते काढत नाही. त्यासाठी किमान पाचशे ते हजार रुपये बँक खात्यामध्ये शिल्लक ठेवावी लागतात व त्यासाठी दोन ते तीन चकरा बँकेत मारावे लागतात. विविध कागदपत्रांची व तांत्रिक जुळवाजुळव केल्यानंतरच बँक खाते नागरिकांच्या पदरात पडत आहे. त्यात मुलांच्या नावासोबत पालकांचे नावाचेही बँक खाते काढावे लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच ही योजना कायमस्वरूपी राहणार नाही, त्यामुळे पालकांचे बँकेमध्ये हजारो रुपये अडकून राहणार याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मिळणारी रक्कम आणि होणारा खर्च पाहता पालकांनी बँक खाते काढण्यास नकार घंटाच वाजविली आहे. त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना फक्त तांदळच देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

आधारकार्ड मिळण्यासाठी अनेक अडचणी आधारकार्ड काढण्याची यंत्रणा बहुतांशी ठिकाणी ठप्प झाल्याने हजारो विद्यार्थ्यांनी आधार कार्डच काढली नसल्याने बँक खाते कसे काढावे असा यक्ष प्रश्न पालकांसमोर उभा आहे. त्यात शासनाकडून आता पहिली ते पाचवीच्या विद्याथ्यांना 156 रुपये तर सहावी ते आठवीच्या मुलांना 234 रुपये बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.