आरटीओच्या १३० कोटींच्या उलाढालीत २० टक्के घट

रत्नागिरीत वाहन खरेदी; दुसऱ्या लाटेचा परिणाम

रत्नागिरी:- वाहन खरेदी उद्योगामध्ये दरवर्षी साधारण १३० कोटींची उलाढाल एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात होत असल्याचे पुढे आले आहे. महिन्याला ८० ते ९०  चारचाकी गाड्यांची खरेदी होते. याची उलाढाल  ७ ते ९ कोटींवर जाते. त्यात वर्षाला सुमारे ५ हजारच्या दरम्यान दुचाकी खरेदी होते. त्याची वार्षिक उलाढाला ३५ ते ४० कोटीवर आहे.  कोरोना महामारीचा वाहन खरेदी उद्योगावर फारसा परिणाम झाला नसला तरी दुसऱ्या लाटेमध्ये २० टक्के वाहन खरेदीमध्ये घट झाली आहे. वाहनांची मागणी आहे, परंतु कंपन्यांकडुन तसा पुरवठा होत नसल्याने वेटिंग कालावधी २ ते ३ महिन्यांचा आहे. 

१०० टक्के कर्ज होत असल्याने अलिशान आणि विविध कंपन्यांच्या वाहनांची जिल्ह्यात जोरदार खरेदी होते. कोरोना महामारीचाही या उद्योगावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. जिल्ह्यात मारूती सुझुकी, हुंडाई, टाटा, फोर्ड कार, रेनॉल्ड, टोयाटो, केईए, एमजे आदी कंपन्यांची शोरूम आहेत. या एजन्सीं मार्फत महिन्याला ३० ते ४५ च्या दरम्यान वाहनांची विक्री होते. एका कंपन्यांची उलाढाला महिन्याला ४ ते ५ कोटीवर जाते.  दुचाकी खरेदी देखील मोठ्या तेजीत आहे. होंडा, सुझुकी, यामहा, टीव्हिएस, बजाज आदी कंपन्यांच्या गाड्यांची देखील ५ ते ७ हजारापर्यंत वर्षाला खरेदी होते. ही उलाढाल ३५ ते ४० कोटी आहे. कार आणि दुचाकीच्या खरेदीतून वर्षाला अब्जावधीची उलाढाल होते हे यातून स्पष्ट होत आहे.

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये देखील वाहन खरेदी उद्योग तग धरुन होता. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये या उद्योगाला २० टक्के घट झाली आहे. वाहन खरेदीत  तेजी आहे, मात्र वेळेवर सुट्टे पार्ट न मिळणे आणि मागणीप्रमाणे गाड्या पुरविण्यात कंपन्या कमी पडत आहेत. त्यामुळे वेटिंग कालावधी वाढू लागला आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. वाहन चालविणे आता  खिशाला न परवडणारे असल्याने सी.एन.जी.चा चांगला पर्याय वाहनधाराकं पुढे आहे. सीएनजी वाहनांची मागणी वाढली असून त्यासाठीही  प्रतीक्षा आहे.