कुवारबाव तळ्यात सापडला तरुणाचा मृतदेह; किरकोळ भांडणाच्या रागातून रविवारपासून होता बेपत्ता

रत्नागिरी:- कुवारबाव गराटेवाडी येथून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय तरुणाने कुवारबाव- विठ्ठल मंदिर जवळील तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी सायंकाळपासून हा तरुण बेपत्ता झाला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन मारुती मठकर (वय २५, रा. गराटेवाडी, कुवारबाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी कोणाला काही न सांगता घरातून बाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत तो घरी न आल्याने त्याचा सर्वत्र शोध सुरु होता. अमन मठकर बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात देण्यात आली होती. त्याचा शोध सुरु असतानाच मंगळवारी सकाळी कुवारबाव येथील विठ्ठल मंदिरानजीक असलेल्या तलावात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. ही माहिती मिळताच सकाळी सव्वाआठच्या सुमारास केतन व त्याचे कुटुंबिय विठ्ठल मंदिर नजिक तलावाकडे दाखल झाले. कपड्याच्या पेहेरावावरुन हा मृतदेह अमन याचाच असल्याची ओळख पटली.

दरम्यान अमन याने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र किरकोळ भांडणातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरु होती. पोलिसांनी मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट केलेले नाही. त्याचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.