पिरंदवणे टोळवाडी येथे हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई

रत्नागिरी:- तालुक्यातील पिरंदवणे टोळवाडी येथील बंधाऱ्याखालील धबधब्यावर आलेल्या पर्यटकांवर ग्रामीण पोलिस आणि पिरंदवणे ग्रामपंचायतीने कारवाई केली. कोरोनाच्या कालावधीत टाळेबंदी असतानाही अशा प्रकार पर्यटनाला आलेल्या सुमारे ३० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सध्या पर्यटकांनी येथे फिरकू नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सरपंच श्रीकांत मांडवकर यांनी दिला आहे.

दोन महिने टाळेबंदीमुळे लोक घरातच बसून आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आता पर्यटनासाठी जाणारे अनेक लोक शनिवार, रविवारी बाहेर पडले होते. समुद्रकिनारे, धबधब्यांवर हे पर्यटक फिरत होते. टोळवाडी येथील बंधाऱ्यावर सुमारे २५ ते ३० पर्यटक आले होते. सूचना दिल्यानंतर काहीजण परतही गेले. परंतु काही लोक ऐकत नसल्याने ग्रामपंचायतीने पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवत पर्यटकांवर कारवाई झाली.
पिरंदवणे टोळवाडी येथे बंधारा बांधण्यात आला आहे. त्याचे पाणी येथील वाडीला उपयोगाला येते. परंतु येथे खालच्या भागात पाणी असल्याने अनेक लोक पार्टी करण्याकरिता येतात. येथे ते धिंगाणा घालतात, दारूच्या बाटल्या फोडून टाकतात तसेच मांसाहार करतात व शिल्लक राहिलेले सर्व बंधाऱ्यात टाकतात. त्यामुळे टोळवाडीला त्रास होत आहे. गतवर्षीसुद्धा येथे असा त्रास झाला होता, अशी माहिती सरपंच मांडवकर यांनी दिली. कोतवडे बीट अमलदार इंदुलकर व सहकारी तसेच उपसरपंच सुनील जाधव, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण लिंगायत, मनस्वी भारती, अश्विनी आंब्रे, शाम शिवलकर, ग्रामसेविका मुधोळे या वेळी उपस्थित होत्या. या घटनेबाबत व पर्यटकांना अटकाव करण्याबाबत जि. प. सदस्य बाबू म्हाप यांनाही कल्पना देण्यात आली आहे.