गुहागर:- मासेमारीसाठी गेलेले दोघे तरुण बेपत्ता झाल्याची घटना गुहागर शहरातील बाग पाचमाड येथील समुद्र परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. सिद्धांत संदेश साठले (२३, रा. आरे कलमवाडी) व प्रतीक किसन किसन नावले (२५, रा. आरे नागदेवाडी) अशी या दोघा तरुणांची नावे आहेत.
तालुक्यातील आरे येथील सिद्धांत व प्रतीक हे दोघे तरुण गुहागर शहरातील बाग पाचमाड येथील समुद्र परिसरात सोमवारी सायंकाळी उशिरा मासेमारीसाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत हे दोघेही परत आले नाहीत. त्यानंतर सायंकाळी दोघांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते तिथे कोठेच दिसले नाहीत. अखेर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. रात्री उशिरा अंधारामुळे तपास कार्य थांबवण्यात आले.ग्रामस्थ व पोलिसांनी मंगळवारी सकाळी या परिसरात शोध सुरू केला. मात्र, अद्यापही या दोघांचा शोध लागलेला नाही. या दोघांचा अजूनही शोध सुरु असून, गुहागर पोलिसांनी दोघांची बेपत्ता म्हणून नोंद केली आहे.