काँक्रिटीकरणासाठीचा प्रस्तावच गेला नसताना 60 कोटी आले कुठून? राष्ट्रवादीचा सवाल

रत्नागिरी:-शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत ना. उदय सामंत सातत्याने खोटं बोलत आहेत. अवकाळी पाऊस, तौत्के वादळ आणि आता जरा काही झाले की पाणी योजनेच्या कॉन्ट्रॅक्टरला दोष देत त्यांच्या माथी खापर फोडले जात आहे. कॉंक्रिटीकरणासाठीचा प्रस्तावच जर रत्नागिरी नगर परिषदेने पाठवला नसेल तर 60 कोटी रुपये मंजूर झालेच कसे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मिलिंद किर यांनी उपस्थित केला आहे.

जयस्तंभ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष निलेश भोसले, माजी तालुकाध्यक्ष बबलु कोतवडेकर आदी उपस्थित होते.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, शहरातील रस्त्यांबाबत अवकाळी पाऊस व तौत्के चक्रीवादळामुळे रस्त्याची कामे झाली नाहीत. मात्र २९ मार्चला हेच सांगतात की ९० टक्के रस्ते हे १५ मे पर्यंत सुस्थितीत होतील. पण चक्रीवादळ हे १५ मे ला आले. त्याच्या आगोदर नव्हे. त्यांनी १५ मे पूर्वी किती रस्त्यांची डागडुजी केली हे सुजान नागरिकांच्या समोर आहे. यावरून आमदार किती खोटे आणि किती खरे बोलतात हे लक्षात येईल.

२०१९ च्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत आमदार सामंत यांनी वचननाम्यात शहरातील मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटिकरणासाठी ६० कोटी रुपये आत्ताच विधान भवनातून मंजूर करून आले. हे ६० कोटी कुठे दिसले नाहीत. परंतु दोन वर्षांमध्ये ८३ कोटीचा जो डीपीआर तयार केला गेला तो आज तयार केला गेला. जे ६० कोटी रुपये शहरातील मुख्य रस्त्यांसाठी मंजूर झाले आहेत. त्याचा पालिकेकडुन प्रस्तावच गेलेला नाही. मग ६० कोटीचा निधी मंजूर कसा असा सवाल किर यांनी उपस्थित केला आहे.