रत्नागिरीतील नव्या स्ट्रेनबाबत शोध सुरू 

रत्नागिरी:- कोरोनाचा नवीन स्टेनचा रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यात प्रसार होतो का याची तपासणी करण्याच्या सुचना आरोग्य विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार संगमेश्‍वर तालुक्यातील ती पाच गावे कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केली गेली, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाप्रमाणे आदेश काढून प्रशासनाने संगमेश्वर तालुक्यातील धामणी, नावडी, म्हाभळे, कसबा, कोंडगाव या गावापासून 3 किलोमीटर परिसर कोरोना बाधित क्षेत्र घोषित केले. याला ग्रामस्थांचा विरोध झाला. याबाबत पत्रकारांशी चर्चा करताना मंत्री सामंत म्हणाले, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे कोकणासह सातारा, कोल्हापूर येथील जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला. उर्वरित महाराष्ट्रापेक्षा या पाच जिल्ह्यांमध्ये वेगळा स्टेन असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यादृष्टीने राज्याच्या आरोग्य विभागाकडून पावले उचलली आहेत. ब्रीटनमध्ये सापडलेल्या डेल्टा स्टेनप्रमाणे कोरोनाचा वेगळा स्टेन आढळण्याची शक्यता लक्षात घेऊन तपासणी सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून संगमेश्‍वर तालुक्यातील धामणी, नावडी, म्हाभळे, कसबा, कोंडगाव ही पाच गावे कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केली. या भागात परदेशातून 30 ते 35 जणं आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली. ते बरे झाल्यानंतर मुंबईकडे रवाना झाले. त्यातील एकाला पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासण्या सुरु आहेत. पुढील चौदा दिवस लक्ष ठेवल्यानंतर आणि सरसकट तपासण्या केल्यावरचा त्याचा निर्णय होणार आहे. काही स्वॅब पाठविले असून त्याचा अहवाल आलेला नाही.
ते पुढे म्हणाले, तिसर्‍या लाटेला निमंत्रण देणारा विषाणू आपल्याकडे येण्याची भिती आहे. नवीन विषाणू आहे की नाही याची चाचपणी सुरु आहे. त्यासाठी येथील स्वॅब ‘एम्स’कडे पाठविले आहेत.