राजापूरात अर्जुना, कोदवली नद्यांना पूर; शहराला पाण्याचा वेढा 

राजापूर:- गेल्या दोन दिवसांपासून सतंतधार पडणार्‍या पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पूराच्या पाण्याने यावर्षी पहिल्यांदाच शहराला वेढा घातला आहे. काल सायंकाळी उशीरा जवाहर चौकामध्ये धडक देणार्‍या पूराच्या पाण्याने जवाहर चौकामध्ये रात्रभर ठिय्या मांडला होता. सुमारे अडीच ते तीन फूट उंच असलेले जवाहर चौकातील पूराचे पाणी आज सकाळी हळूहळू ओसरायला लागले. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने शहराला सुमारे बारा तासाहून अधिक काळ पडलेला पूराचा वेढा कायम राहीला आहे. या पूरस्थितीने शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत जाले आहे. तर, वाढत्या पूराच्या पाण्याने व्यापार्‍यांची धांदल उडविली. 

दुकानामध्ये पूराचे पाणी घुसण्याच्या भितीने व्यापार्‍यांना रात्रभर जागरणे करावी लागली. शहरातील जवाहर चौक परिसर, शिवाजीपथ रस्ता, बंदरधक्का, मुन्शीनाका परिसर, वरचीपेठ रस्ता आदी भाग अद्यापही पूराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे या भागातून वाहतूक कालपासून ठप्प झालेली आहे. तर, शहरालगतचा शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली राहील्याने या गावांचा शहराशी असलेला संपर्क काहीप्रमाणात तुटला आहे. उन्हाळे-दोनिवडे रस्ताही पूराच्या पाण्याखाली राहीला आहे.

गेले दोन दिवस तालुक्यामध्ये संततधार पाऊस पडत होता. पावसाचा जोर कायम असला तरी, अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली नव्हती. त्यामुळे पूरस्थिती ओढवली नव्हती. मात्र, काल दिवसभर मुसळधार पाऊस पडला. त्यामध्ये अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होवून दुपानतंर नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून पूर येवू लागला. अशातच शहरातील शिवाजीपथ रस्त्यासह बंदरधक्का, मुन्शी नाका, वरचीपेठ परिसरासह कोदवली नदीच्या काठावरील टपर्‍या पाण्याखाली गेल्या होत्या. दरम्यान, पावसाचा जोर कायम असताना नगर पालिकेने भोंगा वाजवून सार्‍यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. अशातच रात्री पूराच्या वाढलेल्या पाण्याने शहराला वेढा घालताना थेट जवाहरचौकामध्ये धडक दिली. त्यानंतरही पावसाचा जोर कायम असल्याने पूराचे पाणी सातत्याने वाढताना संपूर्ण जवाहरचौक पाण्याखाली गेला. त्यामध्ये सुमारे अडीच ते तीन फूट उंचीचे पाणी साठले होते. त्यातून नदीच्या पलिकडील लोकवस्तीचा शहरातील अलीकडील लोकवस्तीशी संपर्क तुटला.

शिवाजी पथ रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पूराचे पाणी घुसले. पूराच्या पाण्याचा वेग आणि पातळी सातत्याने वाढत असल्याने सावध झालेल्या व्यापार्‍यांनी दुकानामध्ये पूराचे पाणी घुसण्याच्या शक्यतेने तातडीने दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविण्याला सुरूवात केली. त्यामुळे व्यापार्‍यांचे फारसे नुकसान झालेले नाही. जवाहरचौकातील पूराच्या पाण्याचा हा ठिय्या आज सकाळपर्यंत कायम होता. मात्र, सकाळी 7.30 वा. नंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने काही प्रमाणात पाणी ओसरले तरी, जवाहरचौक परिसर अद्यापही पूराच्या पाण्याखाली राहीले आहे. तर, पूरस्थितीमुळे बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागातही पूराचे पाणी घुसले आहे. शीळ-गोठणेदोनिवडे, उन्हाळे-दोनिवडे रस्ताही पाण्याखाली राहीला आहे. भालावली-देवीहसोळे, बेनगी या गावांमधील काही भागही पूराच्या पाण्याखाली गेला आहे. तर, काठावरील भातशेती पाण्याखाली गेल्याने त्या भागातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत.