मुसळधार पावसामुळे निवळी घाटात दरड कोसळली 

रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसात मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री दरड कोसळली. यामुळे मध्यरात्री २ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोसळलेली दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान पुढील ३ दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. २० जूनपर्यंत मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी पुराचे पाणी वस्तीत आणि शेतात घुसले आहे. आता कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
 बुधवारी रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्टी, काजळी, कोदवली, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी, बावनदी या नद्या ओसंडून वाहत असून धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचल्या होत्या. बुधवारी रात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नाही. 
 

दरम्यान चिपळूणमध्ये रात्रभरापासून मुसळधार पावसाचा जोर कायम होता. वाशिष्ठी आणि शिव नदीचे पाणी पहाटे ३ वाजता बाजरपेठेत शिरण्यास सुरुवात झाली होती. पण पावसाचा जोर ओसरल्याने पुराचा धोका टळला. गुरुवारी सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस सुरू आहे. जोर कमी असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. पण तरीही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. समुद्रलगतच्या रहिवाशांना इशारा देण्यात आला आहे.