दिलासादायक! कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण दरात घट, निर्बंधात शिथिलता मिळणार

रत्नागिरी:- कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पॉझिटीव्हीटी दरात रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर पोचला; मात्र गेल्या चार दिवसात चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे हा दर काल 8.65 टक्केवर आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली. ही रत्नागिरीतील नागरिकांसाठी खुशखबर असून चौथ्या स्तरातील जिल्हा लवकरच तिसर्‍या स्तरातही जाईल.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रत्नागिरी जिल्हयामध्ये गावोगांवी कोरोना संबंधातील चाचणीची मोहिम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे. त्यात आरटीपीसीआर आणि अ‍ॅण्टीजेन या दोन्ही चाचण्यांचा समावेश आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील प्रत्येकाने ही तपासणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.बाधित व्यक्तीनेही आपल्या संपर्कात मागील 14 दिवसांत आलेल्या व्यक्तींची माहिती संबंधित तपासणी पथकाला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्यांना विलगिकरणात रहाणेबाबत सुचना देता येतील.

गावातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाईल याकडे ग्रामकृती दलाचे सहकार्य आहे. बाधित व्यक्ती अलग करुन कोरोनाची साखळी खंडीत करणे शक्य होईल. विशेषत: कन्टेनमेंट झोन मधील प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणे अत्यावश्यक आहे, यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. दुकानदार, भाजी विक्रि करणारे, घरोघरी दूध पुरवठा करणारे, वर्तमानपत्रे वाटप करणारे, इस्त्रीवाले तसेच घरकाम करणा-या व्यक्ती अशा प्रकारच्या जनतेशी मोठा संपर्क असणार्‍या व्यक्तींची तपासणी प्राधान्याने करण्यात येत आहे. अशाप्रकारे किमान 10 दिवसांत जास्तीत जास्त गावाची तपासणी करण्याबाबतचे नियोजन आहे. ही मोहिम सुरु केल्यापासुन जिल्हयाच्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे आढळुन झाली आहे. 9 जुनला पॉझिटीव्हचे प्रमाण 14.33 टक्के होते. ते 16 जुनला 8.65 टक्के झाला आहे.

जिल्ह्याची कोरोना चाचणीची स्थिती खालीलप्रमाणे आहे.

तारीख- चाचण्या- प्रमाण (टक्के)

13 जून- 4219- 16.05%

14 जून- 6339- 10.68%

15 जून- 6291- 9.96%

16 जून- 6964- 8.65%