लोकसंख्येच्या तुलनेत केवळ अडीच लाख चाचण्या

प्रशासनापुढे आव्हान; कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे होत होते दुर्लक्ष

रत्नागिरी:- कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तुलनेत चाचण्यांची संख्या कमी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 16 लाख असून आतापर्यंत दोन लाख 56 हजार चाचण्या करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामध्ये बाधितांची संख्या 44 हजार 658 इतकी आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडील दुर्लक्ष जिल्ह्यातील पॉझिटीव्हीटी रेट वाढीला कारणीभूत ठरत आहे.

कोरोना रुग्ण सापडण्यात राज्यात पहिल्या दोनमध्ये रत्नागिरी जिल्हा आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यातील कडक टाळेबंदीनंतरही बाधितांची संख्या वाढत राहिल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वाढती रुग्ण संख्या आणि कोरोनामुळे वाढणारे मृत्यू अशा दुहेरी संकटांचा सामना आरोग्य यंत्रणा करत आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 14.12 टक्के आहे. कडक निर्बंधांची अंमलबाजवणी शहरी भागांमध्ये राहिली असली तरीही ग्रामिण भागात अनेक त्रुटी होत्या. होम क्वारंटाईन झालेले अनेकजणं फिरत राहिल्यामुळे तेच सुपर स्प्रेडर बनले आहेत. अनेकांच्या चाचण्या केल्या जात आहेत, पण त्यांचे अहवाल आठ दिवस उशिराने येतात. लक्षणे नसलेले अनेकजणं कोरोना स्प्रेडरच्या भुमिकेत आहेत. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यात दररोज सरासरी पाचशे ते सहाशेच्या दरम्यान बाधित मिळत आहेत.

राज्य शासनाकडून फतवा आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून चाचण्या वाढविण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली. तोपर्यंत बाधितांच्या संपर्कात येणार्‍यांपैकी चार ते पाच जणांच्याच चाचण्या होत होत्या. अजुनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर हा प्रती रुग्ण 6 ते 7 पर्यंत आहे. प्रत्येक रुग्णाच्या मागे किमान दहा ते बारा जणांची तपासणी होणे अपेक्षित आहे. सध्या गावोगावी चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे. जिल्ह्याची एकुण लोकसंख्या 16 लाख आहे. नोकरी, व्यावसायाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्याचा आकडा एक लाखापर्यंत असू शकतो. एकुण लोकसंख्येच्या तुलनेत आजच्या घडीला 2 लाख 56 हजार 765 चाचण्या झाल्या. त्यातील 44 हजार 658 बाधित आले असून 38 हजार 406 बरे झाले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दररोज सात हजार चाचण्या करण्यासाठी पावले उचलली जातील असे सांगितले होते; मात्र सध्या साडेतीन ते चार हजार चाचण्याच होत आहेत. यामध्ये मोठी वाढ करण्यासाठी आरोग्य विभागाला यंत्रणा राबवावी लागणार आहे. बाधितांच्या तुलनेत आतापर्यंत साडे आठ लाख चाचण्या होणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने आरोग्य विभागाचे नियोजन थिटे पडत आहे.