गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल

रत्नागिरी:- गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या शक्यतेने गणेशोत्सवासाठी कोकणात यायला न मिळाल्याने चाकरमान्यांनी यावर्षी आतापासूनच गावी येण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण आताच फुल्ल झाले आहे. रेल्वेने 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती दिली आहे.

काही अपवादात्मक गाड्यांच्या एसी टू व थ्री टायरच्या काही जागा शिल्लक असल्या तरीही उर्वरित सर्वच क्लाससाठी सर्वच गाड्यांना शेकडोंच्या घरात प्रवासी वेटिंगवर आहेत. तर परतीच्या प्रवासासाठीही 14 तारखेपासून पुढील सहा -सात दिवसांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असल्यामुळे शहरातील लोकांना कोकणात जाण्यास मज्जाव करण्याला आला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रवेशासाठी कोरोना चाचणी आणि 14 दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला होता. मात्र, यंदा चाकरमान्यांनी ही कसर भरून काढायचे ठरवले आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांसाठी आतापासूनच बुकिंग होताना दिसत आहे. यंदा 10 सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सांस्कृतिक जीवनशैलीचा प्रमुख भाग आहे. कोकणातील प्रत्येक घरात गणपती बसवला जात असल्याने या काळात शहरातील लोक आपापल्या गावी जातात. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षी या प्रथेत खंड पडला होता.

गतवर्षीपेक्षा यंदा कोरोनाचे संकट अधिक गडद आहे. सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्हा हा राज्यातील कोरोनाच्या प्रमुख हॉटस्पॉटपैकी एक आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत आरोग्य यंत्रणांकडून रुग्णांच्या ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. तरीही गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना गावची ओढ लागली आहे.