11 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा घरबसल्याच 

ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू; जिल्ह्यात 75 हजार विद्यार्थांना धडे

रत्नागिरी:-शासनाच्या निर्देशांनुसार नव्या शैक्षणिक वर्षाचा मंगळवार 15 जूनपासून प्रारंभ झाला. सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांना सामोरे जावे लागले. जिल्ह्यातील 1 ली साठी यावर्षीही 11 हजार नवागतांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा घरात बसूनच झाला. मंगळवारपासून शाळांच शैक्षणिक कामकाज सुरू झाले आहे.
   

नवागतांच्या स्वागताचा ‘शाळाप्रवेशोत्सव’ उत्साहात होत असतो. पण कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीपासून नवागतांना या प्रवेशोत्सवाचा आनंद घेताच आलेला नाही. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना शाळा प्रवेशोत्सवाला मुहुर्त लाभलाच नाही. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात 13 हजार 907 बालकांचा 1 लीच्या वर्गात प्रवेश झाला पण प्रत्यक्ष शाळेत जाण्याची त्यांची प्रतिक्षा वर्षभरात पूर्ण झालीच नाही. गेले दिड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतर यावर्षी कोरोना संसर्गाची स्थिती प्रत्यक्ष शाळा सुरू होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  
   

राज्याच्या शालेय शिक्षण विभाग स्तरावर 1 ते 14 जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारपासून शाळांच्या शैक्षणिक कामकाजाला प्रारंभ होत आहे. पण शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नसेल. कोविड 19 चा प्रार्दुभाव कायम असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार नसल्या तरी ऑनलाईन अध्यापनाची सुरूवात मंगळवारपासून होणार असल्याचे जि.प.च्या शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील यावर्षी 1 लीच्या वर्गात 11 हजार विद्यार्थी प्रवेशकर्ते झालेले आहेत. जिल्ह्यात एकूण 75 हजार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शैक्षणिक सत्राचा प्रारंभ झाला आहे.    

जिल्हा प्रशासनाकडून कोविड 19 अंतर्गत शासकीय काम दिलेल्या शिक्षकांना वगळून सर्व शिक्षकांनी 15 जून पासून पूर्णवेळ शाळेत उपस्थित रहावे. त्यांनी ऑनलाईन दैनंदिन अध्यापनाचे व शालेय कामकाज करावयाचे आहे. हे काम करताना जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कोविड संदर्भात प्रतिबंधाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना गटशिक्षणाधिकार्यांमार्पत सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर यांनी सांगितले.