संगमेश्वरमधील सर्व शाळांचा समावेश दुर्गम भागात करा 

माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांची मागणी 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी दुर्गम क्षेत्र निश्‍चित करण्यात शिक्षण विभागाकडून संगमेश्‍वर तालुक्यावर अन्याय झाला आहे. निकषानुसार गावे निश्‍चित झालेली नाहीत. बहूतांश ग्रामीण भाग दुर्गम असल्याने संगमेश्‍वर तालुक्यातील सर्व शाळांचा समावेश दुर्गम भागात करा, असे पत्र माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य रोहन बने यांनी शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी राज्य शासनाकडून नवीन निकष जाहीर झाले आहेत. त्यानुसर दुर्गम भागातील शाळांची यादी तयार करावयाची आहे. कोरोनामुळे यंदा शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात निर्णय झालेला नाही. तरीही प्रशासनाकडून बदल्यांची तयारी सुरु झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील अवघड सर्वसाधारण क्षेत्र व अवघड क्षेत्र यांची यादी तालुकास्तरावर निश्‍चित केली आहे. त्या यादीत अनेक त्रुटी आढळून येत आहेत. संगमेश्वर तालुका हा डोंगरी प्रदेश असल्यामुळे बहुतांश गावात कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंज नसते. बीएसएनएलकडून कडून आलेला अहवाल अमान्य आहे. अनेक गावातील बीएसएनएलचे टॉवर्स् बंद अवस्थेत आहेत. गावातील लोकांना गावाबाहेर काही अंतरावर येऊन नेटवर्क प्राप्त होते. याचा अर्थ त्या गावात नेटवर्क मिळतेच असे नाही. संगमेश्वर तालुका हा डोंगरी विभाग आहे. तसेच शासकीय अहवालानुसार या तालुक्यातील पर्जन्यमान दोन हजार मिमीपेक्षा जास्त आहे. पावसाळ्यात अनेक भागांमध्ये रस्त्यावरून वहाळाचे पाणी वाहत असते, त्यामुळे एसटी सेवा बंद होते आणि इतर वाहनांना जाणे सुद्धा अवघड होते. या माहिती नुसार रिक्षा वाहतुक ग्राह्य धरण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला किंवा शिक्षक वर्गाला आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. याचा विचार करुन शिक्षणाधिकार्‍यांनी निर्णय घ्यावे असे त्या पत्रात नमुद केले आहे.