कोरे मार्गावर पहिल्यांदाच धावली ‘विस्टाडोम’ रेल्वे 

रत्नागिरी:- आरामदायी प्रवास आणि पर्यटन या दोन्ही गोष्टी एकाचवेळी सहजसाध्य करण्यासाठी कोकण रेल्वेने ‘विस्टाडोम’ कोचची निर्माती केली आहे. सुपरफास्ट जनशताब्दी एक्स्प्रेसला ही विशेष सेवा दिली आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये कोकणातील निसर्ग सौदर्याचा आस्वाद घेता येणार आहे. विस्टाडोम असलेली नव्या धाटणीची जनशताब्दी गुरुवारपासून (ता. 10) धावू लागली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या नव्या एलएचबी कोच जोडल्या जात आहेत. नव्या धर्तीवरील ही गाडी आजपासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागली आहे. या गाडीला विस्टाडोम हा डबाही जोडला गेला आहे. कोकण रेल्वे ज्या मार्गावरून धावते, तो डोळ्यात साठवणे म्हणजे एक अद्भुत अनुभव असतो. आजूबाजूला डोळे सुखावणारी हिरवाई, नीळ आकाश, डोंगर माथे आणि पावसाळ्यात ओसंडणारे धबधबे स्वर्गीय अनुभव देतात आणि प्रवास सुखकर होतो. मात्र नेहमीच्या रेल्वेच्या गाडीतून हा अनुभव पूर्णपणे मिळतोच असे नाही. प्रवाशांच्या या आवडीला डोळ्यासमोर ठेवून कोकण रेल्वेने विस्टाडोम ही वेगळी व्यवस्था तयार केली आहे. काच लावलेल्या मोठमोठ्या खिडक्या, बोगीत प्रशस्थ जागा, गोल फिरणार्‍या खुर्च्या, शेवटची मोठी विंडो, अन्य सोयी सुविधांनी असणारी ही रेल्वे पर्यटक प्रवाशांना सुखावणारी आहे. याच विस्टाडोम रेल्वे चा पहिला प्रवास आज कोकण रेल्वे मार्गावरून सुरु झाला आहे. कोरोनाच्या काळातही त्यामधून बाहेर पडून नवी ऊर्जा मिळवण्यासाठी हा आल्हाददायक प्रवास नक्कीच आनंद देणारा ठरणार आहे. या डब्यात गॅलरी असून तेथून निसर्ग सौदर्याचा आस्वाद घेणे शक्य होणार आहे.