पुढील चार दिवस पावसाचे; जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट 

रत्नागिरी:- मान्सून दाखल झाल्यानंतर बुधवारपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर पुढे वाढत जाणार असून 13 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर अति मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. किनारी भागात हलके वारेही वाहत असून रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बुधवारी (ता. 9) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या मागील चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 37.34 मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड 4, दापोली 17.80, खेड 48.40, गुहागर 63.30, चिपळूण 29.50, संगमेश्वर 36, रत्नागिरी 80.30, राजापूर 17.60, लांजा 39.20 मिमी नोंद झाली. गेले दोन दिवस जिल्ह्यात अधुनमधून सरी पडत होत्या. मंगळवारी रात्रभर जिल्ह्यात पाऊस झाला. त्यानंतर बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली आणि सायंकाळपासून पुन्हा संततधार सुरु झाली. हलके वारेही वाहत होते. आमावास्येमुळे शेतकर्‍यांच्या पारंपरिक अंदाजानुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडूनही त्याला दुजोरा मिळाला असून पाच दिवसांचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांसह मच्छीमारांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. 11 जुनला अतिवृष्टी होणार असल्यामुळे पूर परिस्थिती उद्भवू शकते. याचा आढावा विभागिय आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आला. धोकादायक ठिकाणी किंवा पूराची शक्यता असलेल्या भागातील लोकांच्या स्थलांतराची तयारी प्रशासनाकडून सुरु केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई, हरचेरी, टेंभ्ये आणि सोमेश्‍वर येथील लोकांना सतर्कतेच्या सुचना दिलेल्या आहेत.


पावसाच्या कर्फ्यूबाबत संभ्रम

अति मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी 10 ते 12 या कालावधीत परिस्थिती पाहून ‘कर्फ्यू’ लावणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र अजुनही त्याविषयी कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले होते. योग्य वेळी निर्णय जाहीर करु असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.