जिल्ह्यातील 65 गावांनी कोरोनाला रोखले वेशीबाहेर

रत्नागिरी:-कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर ग्रामीण भागांत सर्वाधिक आहे. या परिस्थितीमध्येही जिल्ह्यातील 65 गावांनी कोरोना विषाणूला वेशीबाहेर ठेवण्यात यश मिळवले. शासनाकडून कोरोनामुक्त गावांची स्पर्धा जाहीर केली असली तरी त्यापुर्वीच या गावांनी त्याची अंमलबजावणी करुन दाखवली. सुमारे 30 हजारहून अधिक लोक कोरोनामुक्त आहेत.

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने प्रवेश केला. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत बाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात बाधित सापडण्यामध्ये अव्वल आहे. मृतांची संख्याही अधिक असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मास्क, सोलश डिस्टन्सिंग, सॅनिटायझिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यासाठी आवाहन केेले जात आहे. कोरोनाशी निगडीत लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करुन घेण्यासाठी प्रवृत्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वाडीच्या वाडीमधील ग्रामस्थ सरसकट बाधित येत असल्याने परिस्थिती गंभीर बनत आहे. ग्रामकृतीदलांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या असून गर्दी नियंत्रित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. सार्वजनिक सोहळ्यांवर निर्बंध घालण्यात आली आहेत. बिकट स्थिती असतानाही जिल्ह्यातील 65 गावांनी कोरोनाला वेशीवर ठेवण्यात यश मिळवले आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील गावे सर्वाधिक असून रत्नागिरी तालुक्यातील अवघी चार गावे आहेत. अनेक गावांनी स्वतःहून कोरोनाचे निकष आपणहून पालन करण्यावर भर दिला आहे. परिणामी त्या गावात कोरोना बाधित सापडलेले नाहीत. ही बाब दिलासादायक ठरणारी आहे. कोरोना वेशीवर ठेवणार्‍या गावांमध्ये कर्जी, पोफळवण, बोरगाव आणि वाल्मिकीनगर येथील लोकसंख्या एक हजाराहून अधिक आहे. एवढ्या लोकांचे नियोजन करणे अशक्य होते. तरीही या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही.