केंद्रीय पथकावर माझा काडीमात्र विश्वास नाही: खा. विनायक राऊत 

रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या पथकावर माझा काडीमात्र विश्वास नाही. निसर्ग चक्रीवादळावेळी आलेल्या केंद्रीय पथकाने कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसली होती, असा प्रश्न शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे.

खासदार राऊत हे रत्नागिरी तालुक्याच्या दौर्‍यावर आहेत. गेले दोन दिवस त्यांनी कोरोनातील परिस्थितीचा आढावा घेत सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत. रत्नागिरीत शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी तौक्ते वादळातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी काही दिवसांपुर्वी केंद्रीय पथक आले होते. त्यांनी खेडपासून राजापूरपर्यंत प्रत्यक्ष बाधितांना भेटी दिल्या. त्यांच्याशी संवाद साधून नुकसानीची तिव्रता जाणून घेतली होती. त्यांच्या या दौर्‍यावर खासदार राऊत यांनी प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. ते म्हणाले, तौक्ते चक्रीवादळाशी संघर्ष करुन कोकणातील जनता स्थिरस्थावर झाल्यावर हे केंद्रीय पथक पाहणीकरीता आले आहेत. हे पथक पाहणी करुन काय अहवाल देणार. निसर्ग चक्रीवादळ झाले, तेव्हाही केंद्रीय पथक पाहणीसाठी आले होते. त्यांनी पाहणी केली परंतु प्रत्यक्षात कार्यवाही करताना कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आताही हे शिष्टमंडळही तसेच आले आहे. तौक्ते चक्रीवादळ स्थिरावून बराच काळ गेला आहे. कोकणातील जनता स्थिरस्थावर झाली आहे. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने त्यांचे जीवन सुरळीत केले आहे. आता आलेल्या समितीला काही दिसलं नाही तर तसे ते रीमार्क देतील आणि निघुन जातील. त्यांच्या पाहणीचा फार काही फायदा होईल असं वाटत नाही. राज्य शासनाने नुकसानीची पाहणी करुन मदतही जाहीर केली आहे. आता पथक येऊन काय साध्य होणार.