कोरोनाकाळातील गोंधळ,जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

रत्नागिरी:- गेले वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून वेळोवळी  तासातासाला बदलणारी विविध नियमावली लागू केली. याचा सगळयात जास्त फटका सामान्य नागरिकांना बसला. लॉकडाउनचा पर्याय पूर्णतः विफल ठरला. गणपती, होळी सणांमध्ये राजकीय विचारसरणीबरोबर राहण्यापेक्षा त्याला विरोध करून कठोर निर्बंध लादले असते तर कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असती. तीस दिवसात आपण याला जबाबदार नसल्याचे लेखी सादर करावे, अन्यथा आपणास जबाबदार धरून आपणाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब, ५३, ५५ सह ६१ अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन राज्य व केंदीय समितीकडे तक्रार आणि न्यायालयात गुन्हा दाखल करू, अशी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना ॲड. सूरज मोरे यांनी दिली आहे.  

याबाबत ॲड. मोरे यांनी माहिती दिली. नोटीशीत म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कायदयांमुळे शासकीय अधिकाऱ्यांकडे आलेले अनियंत्रित अधिकार आणि त्यांच्या दुरुपयोगामुळे जिल्हयात अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयात आपत्ती व्यवस्थापनाकरीता गेले वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून वेळोवळी आपणाकडून तासातासाला बदलणारी विविध नियमावली लागू करण्यात आली. ज्यांचा सगळयात जास्त फटका हा सामान्य नागरिकास मोठया प्रमाणावर बसला. टाळेबंदी हा पूर्णतः विफल असा पर्याय आहे हे स्पष्ट झाले आहे. सामान्य नागरिक सूचनांचे वर्षभरापासून काटेकोरपणे पालन करताना दिसून येत आहे. ही सारी नियमावली केवळ सर्वसामान्य नागरिकांवर बंधनकारक आहे. शासकीय अधिकारी मात्र या नियमावलीतून त्यांना सूट असल्याप्रमाणे वारंवार वागताना दिसून आले आहेत.  कोरोना विषाणूने बाधित असलेल्या व्यक्तीला गृह विलगीकरणात ठेवणेची सोय शासनाने बंद केलेली आहे. तरीही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड या कोरोनाने बाधित असून गृहविलगीकरणात असल्याचे समजते आहे. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या जिल्हयातील व्यापाऱ्यांनीही १५ दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणाच्या यातना शासकीय नियमामुळे भोगल्या आहेत.

जिल्हयाचे तत्कालीन परिवहन अधिकारी चव्हाण यांनी जिल्हा बंदी असताना कुटुंबीयांना जिल्हयाबाहेरून रत्नागिरी येथे आणले, ज्यांना आपण विलगीकरणाकामी अशाच रितीने खासगी स्वरुपाची खास सुविधा निर्माण करून दिली होती. रत्नागिरी येथे काही निवडक व्यक्तींच्या लसीकरणासाठी अधिकाऱ्यांनी कॅम्प लावल्याचेही दिसून आले. लांजा येथे नुकतेच कोवीड सेंटरचे उदघाटन शासकीय यंत्रणणे राजकारणी आणि दीडशे ते दोनशे लोकांच्या जमावासोबत केले. लॉकडाउनच्या अनाकलनीय नियमांचा भंग झाल्याच्या कारणास्तव सामान्य नागरिकांवर, व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करणारी यंत्रणा वर उल्लेखीत घटनांबाबत आपल्याकडे तक्रारी होवूनही गप्प बसली, याचा निर्देश नोटीशीत केला आहे.

गणपती-होळी अशा सणांच्या वेळेस आपण जर राजकीय विचारसरणीबरोबर राहण्यापेक्षा त्यास विरोध करून सामान्य नागरिकाच्या हिताचा विचार केला असता आणि अशा सणांवर कठोर निर्बंध लादला असता तर कोरोना बाधितांची अत्यल्प संख्या असलेला आपला जिल्हा आजप्रमाणे कोरोना बाधितांच्या संख्येत आघाडीवर पोहोचला नसता. पूर्णत: विफल ठरलेल्या वर्षभराच्या लॉकडाऊनचा अनुभव गाठीशी असतानाही आता आठ दिवसांचा पुन्हा लॉकडाउन केला. मात्र तर्कविरहीत लॉकडाउन येथील जनता निमूटपणे पाळत आहे, याचाही उल्लेख नोटीशीत केला आहे.