‘निसर्ग’ चक्रीवादळात उध्वस्त शासकीय इमारती, रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत 

रत्नागिरी:- वर्षभरापूर्वी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने जिल्ह्याला तडाखा दिला होता. मंडणगड, दापोली दोन तालुके यात उध्वस्त झाले. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून 202 कोटी 59 लाखाचा निधी मदतीपोटी जिल्ह्याला दिला होता. वर्षभरात त्यातील 152 कोटी 42 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. सुमारे 50 कोटी रुपये शासनाला परत करण्यात आले; मात्र शासकीय इमारतींसह रस्ते दुरुस्तीचा निधी उपलब्ध झालेला नाही.

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा 3 जुनला बसला. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा किनार्‍याकडून भुपृष्टाकडे पुढे सरकला. लॅण्डफॉल श्रीवर्धनला असल्यामुळे सर्वाधिक फटका मंडणगड, दापोलीला बसला. गुहागर, खेड, रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरमधील हानी कमी होती. ताशी 80 ते 110 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वार्‍यांनी घरांचे छपरांसह झाडे उन्मळून गेली होती. यात चाळीस हजाराहून अधिक घरांचे नुकसान झाले होते.

आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून तिप्पट निकष लावून मदत जाहीर केली. त्यानुसार 202 कोटी 59 लाख 26 हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे टप्प्या टप्प्याने दिले गेले. त्याचे तत्काळ वितरणही सुरु करण्यात आले होते. एकुण निधीतील जखमी व्यक्तींना 20 लाखापैकी 6 लाख 92 हजार वितरित झाले. पूर्णतः घरांसाठी प्राप्त 26 कोटी 97 लाखापैकी 21 कोटी 66 लाख, अंशतः घरांच्या नुकसानीपोटी 140 कोटी 70 लाखांपैकी 96 कोटी 96 लाख, नौका व मासेमारी साहित्यांच्या दुरुस्तीसह मदत म्हणून 1 कोटी 16 लाखापैकी 1 कोटी 14 लाख वितरीत केले. वादळापुर्वी स्थलांतर केलेल्यांसाठी मिळालेल्या 20 लाखांपैकी 19 लाख 35 हजार वाटप केले गेले. सार्वजनिक ठिकाणी जमा झालेल्या कचरा व ढिगारे उचलण्यासाठी 1 कोटी 20 लाखांपैकी सर्व रक्कम खर्ची पडली. दुकानदार व टपरीधारकांना मदतीपोटी प्राप्त 74 लाखापैकी 26 लाख 32 हजार रुपये वाटप झाले. घरा, गोठ्यांच्या नुकसानीबरोबरच फळबागायतीला सर्वात मोठा फटका बसलेला होता. 11 हजार हेक्टरवरील फळबागायतील उध्वस्त झाली होती. हेक्टरी 50 हजार रुपयांप्रमाणे 31 कोटी 30 लाख 19 हजार रुपये प्राप्त झाले होते. त्यातील 30 कोटी 84 लाख 44 हजाराचे वाटप शेतकर्‍यांना करण्यात आले. तसेच मृत जनावरांसाठी शेतकर्‍यांना सहाय्य म्हणून 11 लाखापैकी 8 लाख 37 हजार वाटप केले गेले.