बागायतदारांचे कर्ज माफ करा

चक्रीवादळाचा फटका; पावसमध्ये बागायतदार, शेतकऱ्यांची बैठक

रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून पुरेशी मदत दिली जात आहे. परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने बागायतदारांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे किंवा त्यात सवलत द्यावी. तसेच पुढील सर्व कृषी कर्जे ही पाच टक्के दराने आकारण्यात यावीत, अशी मागणी शासनाकडे करण्याचे बागायतदारांनी निश्‍चित केले आहे.

पावस परिसर रत्नागिरी आंबा बागायतदार सहकारी संस्थातर्फे पावस येथील झुलेखा दाऊद उर्दू हायस्कूलमध्ये आंबा बागायतदार, शेतकरी आदींची बैठक झाली. बैठकीला अक्रमशेठ नाखवा, बावाशेठ साळवी, सलीम काझी, अनंत आग्रे हे ज्येष्ठ आंबा व्यावसायिक तसेच मुसद्दीक मुकादम, सुशांत पाटकर, हेमंत खातू, ज्ञानेश पोतकर आदी उपस्थित होते.

चक्रीवादळामुळे आंबा, आंब्याची झाडे, काजू व इतर पिकांचे झालेल्या नुकसानीबद्दल आणि कर्जाच्या पुनर्गठनातील व्याज माफीसंदर्भात चर्चा झाली. चक्रीवादळात झाडे उन्मळून, तुटून पडल्याने शेतकर्‍यांची अनेक वर्षांची मेहनत मातीमोल झाली. सर्व आंबा शेतकरी, बागायतदार यांनी शेतीकर्ज घेतले आहे. त्यावर विमासुद्धा काढला आहे; परंतु विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे आजपर्यंत शेतकर्‍यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. विमा कंपन्या शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षात आंबा बागायतदार, शेतकरी यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. तसेच झालेल्या पुनर्गठनातील कोणत्याही वर्षाचा व्याजाचा परतावा मिळालेला नाही. खत, कीटकनाशके, अवजारे यावरचा जीएसटी माफ करण्यात यावा तसेच त्यावर अनुदान देण्यात यावे.

आंबा बागायतदारांना फवारणी पंपासाठी केरोसिनसाठी (रॉकेल) अनुदान देण्यात यावे. शेतकर्‍यांचे विजेचे मीटर महावितरणमार्फत कमर्शियल प्रकारात घेण्यात आले आहेत. त्यामुळे आंबा बागायतदार, शेतकरी यांना भरमसाठ बिले येतात. सर्व बिलावर पोल्ट्री असा उल्लेख आहे. ही बाब महावितरणच्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष केले जात आहे. शेतीच्या माफक दराने वीजपुरवठा करण्यात यावा व शेती असा उल्लेख वीजबिलावर करण्यात यावा, अशी मागणी करण्याचे ठरवण्यात आले.