चिपळूणात 7 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल 

चिपळूण:- अनेकवेळा समज देऊनही दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिपळूण पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. सोमवारी दिवसभरात पोलिसांनी 7 व्यापाऱ्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. त्यामध्ये चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांचा समावेश आहे तसेच वाहनांवरदेखील धडक कारवाई केली जात आहे.

लॉकडाऊन काळात ‘अत्यावश्यक सेवे’तील दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत मुभा देण्यात आली आहे. तर अन्य दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत तरीही सकाळी 11 नंतर काहीजण दुकानांचे शटर बंद करून मागील दाराने ग्राहकांना दुकानात घेऊन व्यापार करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलिसांनी थेट कारवाईचे सत्र सुरू करून अनेक व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

ग्रामीण भाग आणि बाजारपेठेत पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांची गस्त सुरू असताना काही दुकानांत विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सदाकत शरिफ पेचकर (खाटीक आळी), प्रभुस्वामी सिद्धप्पा मठपती (कोलेखाजन), शांताराम दुधाजी घाणेकर(कुंभार्ली), विशाल रमेश जाणवळकर (खेंड), महेंद्रकुमार शोगाजी प्रजापती (भेंडीनाका), श्रीरंग गणपत माजेलकर (पानगल्ली), प्रमोद महादेव खातू (वाणीअळी) या 7 व्यापाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवें पोळ गस्त आणि कारवाई करत असताना दुसऱ्या बाजूला पोलिसांनी दुसरी टीम विनाकारण विना हेल्मेट फिरणाऱ्यावर तसेच विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाईचे सत्र सुरू ठेवण्यात आले आहे.