जिल्ह्यातील 753 शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेचा लाभ 

रत्नागिरी:- खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येत आहे. यावर्षी 753 शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. आतापर्यंत 251 लाभार्थी शेतकर्‍यांपैकी 238 शेतकर्‍यांना पीक विमा योजनेची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित 13 लाभार्थ्यांची नुकसानभरपाईची रक्कम मात्र लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात मुख्यत्वे भात पिकाचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्यात 69 हजार 479 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते. पावसावर अवलंबून भात शेती असून, जिल्ह्याची भाताची उत्पादकता चांगली आहे. भाताच्या उत्पादकतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर विमा परतावा देण्यात येतो. मात्र, उत्पादकता चांगली असल्याने गेल्या दोन वर्षांपर्यंत शेतकर्‍यांना विमा परतावा प्राप्त झाला नव्हता. मात्र, गेले दोन वर्षे काढणी पश्चात भात शेतीच्या पावसामुळे व पुरामुळे नुकसान होत असल्याने काढणी पश्चातील नुकसानीचा समावेश विमा योजनेंतर्गत करण्यात आला आहे. यावर्षी काढणी पश्चात 230 शेतकर्‍यांच्या भात पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे लाभार्थी शेतकर्‍यांना 14 लाख 27 हजार 700 रुपयांचा परतावा प्राप्त झाला आहे. महसूल मंडलातील 13 लाभार्थी शेतकर्‍यांना पीक कापणी प्रयोगानंतर परतावा दिला जाणार आहे. त्याचे वितरण रखडले आहे. भात पिकाचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर पीक विमा परतावा दिला जातो. मात्र, कोकणात 70 टक्क्यांपेक्षा उंबरठा उत्पादन आहे. त्यामुळे 2018 पर्यंत शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पीक विमा योजनेंतर्गत लाभ मिळाला नव्हता. 2019 मध्ये पुरामुळे नुकसान झाल्याने सरसकट नुकसानभरपाई देण्यात आली होती.

जिल्ह्यातील 69 हजार 479 हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्याची भाताची उत्पादकता 24.73 क्विंटल आहे. उत्पादकता जिल्ह्याची चांगली आहे; परंतु भात पीक काढणीनंतर अवेळीच्या पावसामुळे होत असलेले नुकसान ग्राह्य धरून शेतकर्‍यांना परतावा देण्यात येत आहे. यावर्षी 238 शेतकर्‍यांना काढणी पश्चात झालेल्या नुकसानीबद्दल परतावा प्राप्त झाला आहे. पीक कापणी प्रयोग महसूल मंडलांतर्गत राबविण्यात येतो. प्रत्येक महसूल मंडळात हा प्रयोग राबविल्यानंतर उत्पादकता निश्चित केली जाते. कमी उत्पादकता असणार्‍या मंडलातील शेतकर्‍यांना परतावा दिला जाणार आहे.