निवळीतील हॉटेल वृंदावनवर जिल्हा प्रशासनाची कारवाई

रत्नागिरी:- प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळानंतरही हॉटेल सुरू ठेऊन, प्रवाशांना टेबल सर्व्हिस दिल्याप्रकरणी निवळी (ता. रत्नागिरी) येथील हॉटेल वृंदावनवर तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडून कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टांरंट यांना सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत कोरोना नियमावलींचे पालन करुन फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये बसून जेवण्यास मनाई आहे. तसेच हॉटेलच्या ठिकाणी गर्दी करता येणार नाही. त्याचप्रमाणे सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी किंवा लसीकरण केलेले असणे बंधनकारक आहे. 

याअनुषंगाने दि. २५ मे रोजी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अचानक रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील हॉटेल वृंदावन ला भेट दिली. त्यावेळी हे हॉटेल सुरु असल्याचे व एका आराम बसमधील प्रवासी हे टेबल सर्व्हीस घेताना आढळले. त्याचप्रमाणे याठिकाणी गर्दीही दिसली. 

त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार रत्नागिरीचे तहसीलदार, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व अन्न व औषध प्रशासन या विभागांमार्फत या हॉटेलवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हॉटेलमध्ये टेबल सर्व्हीस देणे, सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी केलेली नसणे, कोरोना नियमावलींचे उल्लघंन केल्याने तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तत्काळ हॉटेल वृंदावन हे पुढील आदेशापर्यंत सीलबंद केले. तसेच कोरोना नियमावलींचा भंग केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल आस्थापनावर १३ हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली आहे.