‘माझा डॉक्टर’ संकल्पनेत सहभागी होणाऱ्या डॉक्टर्सची नोंद करून मार्गदर्शन द्या 

जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रशासनाला सूचना 

रत्नागिरी:-कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ‘माझा डॉक्टर’ संकल्पनेत सहभागी होणार्‍यांची नोंद करुन त्यांना मार्गदर्शन द्यावे. जेणेकरुन शासकीय रुग्णालयात होणारे उपचार गावातील फॅमिली डॉक्टर्स्च्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर होतील याची काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना केली.

कोरोनाविरूध्दच्या लढयात सर्व खासगी डॉक्टर्स्ना सहभागी करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ’माझा डॉक्टर’ ही अभिवन संकल्पना संपूर्ण राज्यात सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत आहेत. ही संकल्पना जिल्हा प्रशासनाने योग्य पध्दतीने ग्रामीण भागात राबवली तर अनेक कोरोना बाधितांवर सहजरित्या उपचार होणार आहेत. तसेच शासकीय रुग्णालयांवरील ताणही कमी होईल. रत्नागिरी जिल्ह्यात ही संकल्पना राबवताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना असंख्य रूग्णांनी सुरूवातीला खासगी किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे उपचार घ्यायला सुरूवात केली. मात्र काही रूग्णांवर चुकीच्या पध्दतीने उपचार झाल्याने त्यांची प्रकृती खालावली. अखेर अधिक उपचारांसाठी त्यांना अन्य ठिकाणी दाखल करावे लागले. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेवून त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ’माझा डॉक्टर’ मोहिमेत जिल्हयातील किती डॉक्टर सहभागी होवू इच्छितात, याची यादी जिल्हा प्रशासनाने तयार करावी. त्या डॉक्टरांना कोरोना रूग्णांवरील उपचारांबाबत वैदयकीय तज्ञांमार्फत मार्गदर्शन दिले जावे आणि त्यांना कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती परवानगी देणारे प्रमाणपत्र प्रशासनाने द्यावे. ’माझा डॉक्टर’ या मोहिमेत सहभागी होणार्‍या प्रमाणित फॅमिली डॉक्टरांनाच कोरोना रूग्णांवर उपचारांची परवानगी दिली जावी. जेणेकरुन शासकीय रुग्णालयात होणारे उपचार गावपातळीवर होतील आणि रुग्णांना दिलासा मिळू शकेल. या मोहिमेत सहभागी न होणार्‍या डॉक्टरांकडून कोरोना रूग्णांवर उपचार केला जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची गंभीर दखल घेतली जावी. कोरोना रूग्णांवर योग्य पध्दतीने उपचार व्हावेत, मृत्यूदर कमी व्हावा, सरकारी दवाखान्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी या सुचनेतील मुद्दे जिल्हा प्रशासनाने अभ्यासावेत आणि अंमलबजावणी करावी असे अध्यक्ष विक्रांत यांनी निवेदनाद्वारे सुचित केले आहे.