संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईची धडक मोहीम 

रत्नागिरी:-संचारबंदीचे उल्लंघन करतान दुकानांसह हॉटेल सुरु ठेवणार्‍या जिल्ह्यातील 11 जणांसह चार मास्क न लावणार्‍यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तर जयगड ते मुंबई खासगी लक्झरीद्वारे वाहतूक करणार्‍यांला पोलिसांनी दणका दिला.

कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका असतानाही दुकाने निर्धारित वेळेनंतरही उघडी ठेवल्याप्रकरणी रत्नागिरी शहरातील चार दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई  शनिवार 22 मे रोजी दुपारी  12.30 ते सायंकाळी 7.30 वा कालावधीत बाजारपेठेत करण्यात आली. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा संभव असतानाही सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावणार्‍याविरोधात निवळी तिठा पोलिसांनी कारवाई केली. रोहिदास अभिमान खाडे (26, रा. वेतोशी धनगरवाडी, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.
जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असतानाही अनधिकृतपणे लक्झरी बसमधून चाफे ते मुंबई सहा प्रवाशांची अवैध वाहतुक करणार्‍या चालकाला जयगड पोलिसांनी दणका दिला. ही कारवाई शनिवारी (ता. 22) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास चाफे तिठा येथे केली. मनोहर शांतराम गायकर (43, रा. अडूर नागझरी, गुहागर) असे चालकाचे नाव आहे. लक्झरी बसमधील प्रवाशांकडे ई पास नव्हता. तसेच प्रवाशांचा पल्सरेट, ऑक्सिजन लेवल आदीची तपासणीही केली गेलेली नव्हती.
रत्नागिरी तालुक्याबरोबरच जिल्ह्यात सगळीकडेच दुकानदारांसह मास्क न लावणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. देवरुख बाजारातील साजन माधवन वेणुमन यांच्यावर मास्क न घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. संगमेश्‍वर करजूवेतील वाकसाळवाडीत किराणा मालाचे दुकान सुरु ठेवल्या प्रकरणी मालकांविरोधात कारवाई केली. धामापूर तर्फे संगमेश्‍वर ढोपरखोलवाडी येथील किराणा मालाचे दुकान सुरु ठेवल्या प्रकरणी हेमंत शामसुंदर बाष्टे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. राजापूर तालुक्यात धाऊलवल्ली भंडारवाडीतील मंगेश दिपक कोठारकर आणि साखरीनाटेतील रय्याज फय्याम तांडेल आणि धारतळेतील अनिल सुर्वे या तिघांवर मास्क न लावल्याप्रकरणी कारवाई केली. अलोरे-शिरगाव येथे पेढांबे भराडे एसटी पिकअप शेडच्या जवळील किराणा मालाचे दुकान, चिपळूण पागनाका समर्थ भाजी दुकान, गोवळकोट येथील इम्प्टीसीयाल ट्रेडर्स हे दुकान तर गोवळकोट रोड परिसरात हातगाडीवर आंबा विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.