नांदगाव येथे वृद्धावर खुनी हल्ला; संशयित पोलिसांच्या ताब्यात

खेड:- खेड तालुक्यातील खाडीपट्टा परिसरातील नांदगाव येथे 57 वर्षीय इसमावर खुनी हल्ला होण्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडली. दिलावर भोकरे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. या प्रकरणी खेड पोलिसांनी एका संशयितास अटक केली असून अवधूत घोडे (21) असे या संशयिताचे नाव आहे. अवधूत हा खेड शहरातील कोष्टी आळी परिसरात राहणारा असून हा हल्ला आर्थिक देवाण- घेवाणीतून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

खाडीपट्ट्यातील खेड बहिरवली मार्गावर असलेल्या नांदगाव येथे हा इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका ग्रामस्थाला आढळून आला. त्याच दरम्यान खेड येथील सामाजिक कार्यकर्ते बुरहाण टांके हे त्या रस्त्याने जात होते. त्यांनी त्या इसमाजवळ जावून पाहिले असता तो जिवंत असल्याचे लक्षात आले. टांके यांनी तात्काळ पोलिसांना खबर देवून रुग्णवाहिका बोलावून घेतली. जखमी अवस्थेत पडलेल्या त्या इसमाला तात्काळ आधी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालय तिथून डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात व तिथून कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरिक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत गडदे, हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेनेत परिसरात खळबळ उडाली आहे.