तौक्ते चक्रीवादळात 64 मच्छीमारी नौकांसह 71 जाळ्यांचे नुकसान 

रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळ सरून गेल्यानंतर प्रशासन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्यांच्या आकडेवारीत प्रत्येक दिवशी भर पडत आहेत. समुद्र किनार्‍यावरील 64 मच्छीमारी नौकांबरोबरच 71 मच्छीमारांच्या जाळ्यांचेही नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यामधून पुढे आले आहे.

जिल्ह्यात 17 घरे पूर्णत: बाधित झाली असून, अंशत: बाधित घरांची संख्या 7 हजार 865 आहे. त्यात सर्वाधिक दापोलीत 2 हजार 466 तर रत्नागिरी तालुक्यात 1 हजार 109, राजापुरात 893 घरांचे नुकसान झाले. गोठ्यांची संख्या 446 इतकी आहे. या व्यतिरिक्त दोन झोपड्यांचे नुकसान झाले आहे. वादळात वार्‍यामुळे 1042 झाडे पडली. त्यात सर्वाधिक 792 झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या 250 इतकी आहे. चक्रीवादळात 60 दुकाने व टपर्‍यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या 56 आहे. या सर्व शाळा राजापूर तालुक्यामधील आहेत. साधारण 2500 हेक्टर क्षेत्र बाधित असून 5 हजार 709 शेतकर्‍यांचे 1 हजार 278.5  हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात 1239 गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत 1179 गावांचा पुरवठा आता पूर्ववत करण्यात आला आहे. बाधित उपकेंद्राची संख्या 55 व फिडरची संख्या 206 आहे. याची दुरुस्तीदेखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्च दाब वाहिनीचे 485 खांब बाधित झाले असून यापैकी 125 पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या 1233 इतकी आहे. यातील 133 खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात समुद्रकिनार्‍यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी 3 बोटी पूर्णत: तर 65 बोटींचे अशंत: नुकसान झाले. 71 जाळ्यांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान 1 कोटी रुपयांपर्यंत आहे. या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या 301 मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे 1 कोटी 98 लाख 84 हजार पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.