कोकणाला शासनाकडून भरीव मदत देण्याचा प्रयत्न: ना. वडेट्टीवार

राजापूर:- तौक्ते वादळात नुकसान झालेल्यांना भरपाई देताना कोकणी माणूस नाराज होणार नाही याची काळजी घेऊन कोकणाला शासनाकडून भरीव नुकसानभरपाईची मदत देण्याचा प्रयत्न राहील, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

तौक्ते वादळाने सागरी किनारपट्टीवरील गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर वडेट्टीवार शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोकणामध्ये दरवर्षी वादळ, पूरस्थिती यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते; मात्र, कोकणाला फारशी मदत मिळत नाही. या वेळी कोकणाला शासनाकडून भरीव नुकसानभरपाईची मदत देण्याचा प्रयत्न राहील. वादळातील मृत्यू झालेल्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यात आली असून, उर्वरित नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते पूर्ण होतील. त्यानंतर उर्वरित लोकांना शासनाकडून मदत केली जाईल. तौक्ते वादळातील आपद्ग्रस्तांना मदत मिळण्याबाबत केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करणार आहोत. त्यामध्ये नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक पाठविण्यासह आपद्ग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणी त्यांच्याकडे करणार आहोत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौर्‍यावर असून ते नुकसान भरपाई संबंधित घोषणा करणार असल्याचे सांगत त्यांनी स्वतः नुकसान भरपाई संबंधित कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. राज्याप्रमाणे केंद्राचीही आपद्ग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

या वेळी आमदार राजन साळवी, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, प्रदेश सचिव रमेश कीर, काँग्रेस नेते अविनाश लाड, नगराध्यक्ष अ‍ॅड.खलिफे, उपनगराध्यक्ष बाकाळकर, तहसीलदार वराळे आदी उपस्थित होते. आपद्ग्रस्तांना मदत देण्याची राज्यासोबत केंद्राचीही जबाबदारी आहे; मात्र मदत देण्याबाबत केंद्राने हात आखडते घेतल्याचे वडेट्टीवर यांनी सांगितले. गतवेळी झालेल्या आपत्तीवेळी केंद्राकडून सहा महिने उशिरा राज्याला मदत मिळाल्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली.