वादळग्रस्तांच्या मदतीसाठी धावले रत्नागिरी पोलीस 

रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी तालुक्याला चांगलाच बसला आहे. या वादळात तालुक्यात अनेक ठिकाणी पडझाड झाली असून काही ठिकाणचे मार्ग बंद झाले होते. मात्र रत्नागिरी पोलीस दलाने मदतीसाठी धाव घेऊन हे मार्ग सुरळीत केले.

चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून किनारपट्टी भागातील गावात राहणार्‍या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात बोटी घेऊन जाऊ नये, इतर नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये याबाबत विविध माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी सकाळपासून बंदोबस्त व  पेट्रोलिंग नेमण्यात आली होती.

रविवारी दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. ताशी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये झाडे  पडून नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर झाडे पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

धो धो पावसात वृक्ष कोसळत असताना रत्नागिरी जिल्हा पोलीस दल मदतीसाठी धावले. पोलीस दलाने स्वतःकडील  उपलब्ध साहित्याचा वापर करून ग्रामस्थांच्या मदतीने सदर झाडे तात्काळ दूर करून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला आहे.

वादळी वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत असताना रत्नागिरीतील काही भागात पडझड झाली याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी स्वतः मिरजोळे , नाचणे येथे जाऊन पडझड झालेल्या ठिकाणी  भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करून आढावा  घेतला. व नागरिकांना घाबरून न  जाण्याचे आवाहन केले.

पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीत कोळंबे गावाच्या रस्त्यावर मोठे झाड पडले होते. पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी स्वतः पूर्णगड पोलीस स्टेशनच्या मदतीने झाड दूर करून रस्ता वाहतूक सुरळीत केला.

मिळालेल्या माहितीनुसार देवरूख पंचायत समिती समोर भलेमोठे झाड कोसळले. देवरूख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप व त्यांच्या सहकार्‍यांनी तात्काळ झाड दूर करून रस्ता वाहतूक सुरळीत केला. तसेच देवरूख येथील मात्र मंदिर येथे झाड पडलेले होते. या ठिकाणी देवळी पोलिसांनी तात्काळ जाऊन झाड दूर करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील नाटे ते पावस जाणार्‍या रस्त्यावर भले मोठे झाड पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पूर्णगड पोलिसांनी तत्काळ ते झाड दूर करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

या चक्रीवादळाचा तडाखा किनारपट्टी भागाला बसू लागल्याने दापोली पोलिसानी महसूल विभागाच्या मदतीने किनारपट्टी भागातील केळशी, हर्णे, अडखळ गावातील लोकांना अन्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कार भाटले या गावातील रस्त्यावर झाड पडून  वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तेथे संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार  यांनी तात्काळ दखल घेऊन सदर झाड ग्रामस्थांच्या मदतीने कट करून रस्ता वाहतूक सुरळीत केला.

मागील निसर्ग चक्रीवादळाचे अनुभव ताजे असतानाच नाटे पोलीस स्थानकाचे हद्दीतील किनारपट्टी भागातील लोकांना चक्रीवादळाचा धोका होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याकरिता नाटे पोलिसांनी मदत केली. काही नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आले.

रत्नागिरी शहरात जवळील भाट्ये येथे मुख्य रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे रत्नागिरी- पावस मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.