‘तोक्ते’ वादळाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान 

रत्नागिरी:- ‘तोक्ते’ चक्रीवादळाने रविवारी (ता. 16) राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वरला तडाखा दिला. घोंघावणार्‍या वार्‍यांसह मुसळधार पावसाने नागरिकाना धडकी भरली. जुनाट वृक्षांसह छोटी-मोठी झाडे कोसळली. छतांचे पत्रे जमिनीवर आदळले. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होता. घरा, गोठ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
 

गतवर्षी ‘निसर्ग’चा अनुभव असलेल्या गुहागर, दापोलीसह मंडणगडात हे वादळ सोमवारी (ता. 17) दाखल होणार असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक घरातच होते. किनारी भागातील ग्रामस्थ जीव मुठीत ठेवून बसले होते. राजापूरात आंबोळगडसह आजुबाजूच्या गावातील एकमेकांशी संपर्क तुटला. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. वीजपुरवठ्यासह दूरध्वनी सेवाही विस्कळित झाली. सायंकाळी पाच वाजल्यानंतर रत्नागिरीत जोरदार वार्‍यांसह पुन्हा पाऊस सुरु झाला. पूर्णगड, गणेशगुळे, पावस, जयगड, मिरकरवाडा, भाट्ये, मिर्‍या या भागांसह काळबादेवी, साखरतर, खालगावात सायंकाळी वार्‍याचे तांडव सुरु होते. झाडे पडून वाहतूक ठप्प झालेले रस्ते मोकळे करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले होते. वादळाची तीव्रता संगमेश्‍वर, लांजा तालुक्यांतही जाणवली.
जिल्ह्यात रविवारी (ता. 16) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात रत्नागिरी तालुक्यात 39 मिमी, संगमेश्वरात 22 मिमी, दापोली आणि गुहागरात प्रत्येकी 12 मिमी, लांजा आणि राजापूरला प्रत्येकी 13 मिमी पाऊस पडला.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजापूरातील 8 घरे व 1 गोठा, संगमेश्‍वरात 16 घरांचे 39 हजार रुपये, दोन गोठे 65 हजार आणि तीन दुकानांचे नुकसान झाले. रत्नागिरीत 12 घरांचे 35 हजार, दापोलीत 3 घरांचे 78 हजार, खेड 3 घरांचे 51 हजार, चिपळूणात दोन घरांचे तर गुहागरमध्ये अंशतः 2 घरांचे नुकसान नोंदले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पैसा फंड इंग्लिश स्कूल जवळ असलेल्या संगमेश्वरवासीयांचे ग्रामदैवत जाखमाता मंदिरावर आंब्याचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरु असल्याने मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरील बराचसा भाग तोडण्यात आला. मंदिराजवळील आंब्याचे झाड उन्मळून त्याचा काही भाग मंदिराच्या छपरावर पडल्याने कौले फुटली.