दाभोळे घाटात दोन ट्रकचा अपघात; एकजण गंभीर जखमी

रत्नागिरी:- कोल्हापूर हायवे नजिक दाभोळे घाटामध्ये मालप वाडी जवळ असणाऱ्या अवघड वळणावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन रविवारी सकाळी अपघात झाला. यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर एक गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जयगड येथून साताऱ्याच्या दिशेने जाणारा ट्रक (MH-11-CH-6780 ) आणि कोल्हापूर वरून रत्नागिरी च्या दिशेने जाणारा आयशर ( MH 09 BC 166) यांची समोरासमोर धडक बसून आयशर चालक संभाजी गोसावी (45, कोल्हापूर ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

चालकाला प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. तसेच ट्रक चालक गणेश गोळे (33) हे ह्या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साखरपा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.

ह्या घटनेची बातमी मिळताच पी एस आय विद्या पाटील यांनी घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन दोन्ही वाहने जे सी बी च्या साहाय्याने बाजूला करून घटनेचा पंचनामा केला व खोळंबलेली वाहतुक पूर्वरत आणली.यावेळी त्यांच्यासोबत पोलीस नाईक अर्पिता दुधाणे,हेमा गोतावडे, कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर, वैभव कांबळे,वैभव नटे आदी कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनेचा अधिक तपास साखरपा पोलीस दुरक्षेत्राकडून सुरू आहे.