जिल्ह्यात दाखल होण्यासाठी आरटीपीसीआर अहवाल असणे बंधनकारक: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- कोणत्याही वाहनाने अन्य संवेदनशील जिल्ह्यातून जसे की, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणाहून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींनी आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल सोबत बाळगणे आवश्यक राहील. सदरचा अहवाल प्रवेशाच्या 48 तासांपुर्वीचा असावा किंवा MHPOLICE बेवसाईटकडून मिळालेला अधिकृत ई-पास वाहनासोबत ठेवणे बंधनकारक राहील. त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला असून, शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020” प्रसिध्द केलेले आहेत. व त्यास अनुसरुन राज्य शासनाने निर्बंध जारी केले आहेत.
                   

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत टाळेबंदीचा कालावधी दिनांक 01 जून 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजेपर्यंत वाढवून यापुर्वीच्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांसह खालील आणखी काही अतिरिक्त निर्बंध लागू राहतील असे निर्देशित केले आहे.
                       

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार सदर आदेशाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात करणे आवश्यक असल्याने लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी सदरचा आदेश निर्गमित करीत आहे.
     

कोणत्याही वाहनाने अन्य संवेदनशील जिल्ह्यातून जसे की, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणाहून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींनी आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल सोबत बाळगणे आवश्यक राहील. सदरचा अहवाल प्रवेशाच्या 48 तासांपुर्वीचा असावा, किंवा MHPOLICE बेवसाईट कडून मिळालेला अधिकृत ई-पास वाहनासोबत ठेवणे बंधनकारक राहील. त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत फक्त दोन व्यक्तींस ( ड्रायव्हर + क्लीनर / मदतनीस) प्रवास करण्याची परवानगी राहील. जर कार्गो वाहतुक ही राज्याबाहेरील असेल तर त्या वाहनातील कर्मचाऱ्यांनी आरटिपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. सदर अहवाल रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवेशाच्या 48 तासांपूर्वीचा असावा व तो 7 दिवसांकरीता वैध राहील.
     

मेडीकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा, व आरोग्य विषयक आस्थापना 24 तास कार्यरत राहतील.
   रत्नागिरी जिल्ह्यात नागरी व ग्रामीण भागामध्ये नाशवंत वस्तुंमध्ये मोडणारे भाजीपाला, फळे, व दुध विक्रेत्यांची दुकाने सकाळी 07.00 ते 11.00 यावेळेत सुरु ठेवता येतील. तथापि, त्याठिकाणी सामाजिक अंतर राखणे व गर्दी टाळणे बंधनकारक राहील. गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यास ती तात्काळ बंद करण्यात येतील. नाशवंत वस्तू जसे की, भाजीपाला, फळे, व दुध वगळून अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील. त्यांना केवळ घरपोच सेवा पुरविता येईल.
         

सदरचा आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) लागू राहील.यापुर्वीच्या आदेशान्वये घातलेले निर्बंध व सुट या आदेशासह कायम राहतील.सदरच्या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 17 मे, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजले पासून ते दिनांक 23 मे, 2021 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील असे आदेशात म्हटले आहे.