वादळाचा धसक्याने मासेमारी नौकांनी घेतला बंदरांचा आधार

रत्नागिरी:- गेले दोन दिवसांपूर्वीपासूनच शासनाचा ‘तौक्ते’ वादळाचा संदेश आल्यानंतर मच्छीमारांची एकच धावपळ उडाली आहे. १५ मे व १६ मे दरम्यान वादळ रत्नागिरी जिल्ह्याकडे सरकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून मच्छिमारांना व किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा संदेश आल्यामुळे मच्छीमारांनी सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणच्या बंदरांचा आसरा घेतला आहे. जिल्ह्यातील प्रमुख बंदरांवर सध्या मासेमारी नौकांनी गर्दी केली आहे. 

वादळाच्या सतर्कतेचा संदेश मिळाल्याने हर्णे बंदरातील नौकांनी आंजर्ले, जयगड, दाभोळ(रत्नागिरी), दिघी(रायगड) खाडीत आसरा घेतला आहे. रत्नागिरीतील नौकांनी देखील माघारी वाट धरली. गेल्यावर्षी निसर्ग वादळ जून महिन्यात आलं होतं त्यावेळी नौकां शाकारण्याचं काम आटोक्यात आलं होतं. तरीही भरपूर नौकांच नुकसान झाले होते. त्याच भीतीपोटी मच्छीमारांनी धावपळ सुरू केली.

दरम्यान, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग ८० किमी पर्यंत जाणार असल्याचा संदेश हवामान खात्यकडून मिळाल्यामुळे मच्छिमारांनी घाबरून मासेमारीला ब्रेक लावला. निसर्ग वादळाच्या भरमसाठ नुकसनानंतर जो तो स्वतःला सावरत या उद्योगामध्ये उभा रहात होता. काही उभे राहिले तर काही थांबले. आणि नंतर मात्र फास्टर नौका व एलईडी नौकांच्या अवैध मासेमारीने पारंपरिक मच्छीमाराला मेटाकुटीस आणले आहे. अशाही परिस्थितीत प्रत्येक बंदरातला मच्छीमार आपला उद्योग करत होता. यावर्षी मासेमारीचा हंगाम पाहिजे तसा मिळालाच नाही. नुकतेच अखेरचे दिवस आले असताना मासळी बऱ्यापैकी मिळू लागली होती पण व्यवस्थित दर मिळत नव्हता. आणि त्यातच हे तौक्ते वादळ येऊन ठेपल.

 वादळ किती परिणामकारक असेल याचा विचार करत बसण्यापेक्षा नौका सुरक्षित ठिकाणी हलवणे हिताचे ठरेल याचाच विचार करून बहुतांशी बाहेर मासेमारीकरिता गेलेल्या १५० नौकांनी दिघी , १२० नौकांनी जयगड, ५० ते ६० नौकांनी दाभोळ, तर ७०० ते ८०० नौकांनी किमान आंजर्ले खाडीपासून ते किमान ५ किमीच्या अंतर म्हणजे पाटीलवाडी पर्यंत वादळापासूनच्या सुरक्षिततेसाठी आसरा घेतला आहे.