जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सभा दीड तासात आटोपली

अध्यक्षांचे योग्य नियोजन; बहुतांश विषय निकाली

रत्नागिरी:- अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यानंतर विक्रांत यांनी वेळेच बंधन घातले होते. त्यानुसार शुक्रवारी सभा वेळेत झाली. सभेच्या अजेंड्यावर 44 विविध प्रश्‍न होते; मात्र त्यातील 36 प्रश्‍न हे राज्य शासनाच्या विविध खात्यांकडील आहेत. जिल्हा परिषदेचे आठच प्रश्‍न शिल्लक राहीले आहेत. त्यामुळे सभा दिड तासात आटोपली. स्टेटच्या खातेप्रमुखांनी येत्या काही दिवसात हे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. पुढील सभेला हे प्रश्‍न शिल्लक राहणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी तंबी पुन्हा अध्यक्ष विक्रांत यांनी दिली.

कोरोनामुळे स्थायी समितीची सभा विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सर्व अधिकारी, सदस्य व सभापती उपस्थित होते. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत चांगला लढा दिला. मुख्यमंत्र्यांच्या नियोजनाचे केंद्र सरकारबरोबरच सुप्रिम कोर्टानेही कौतुक केले. तसेच महाराष्ट्राचे मॉडेल म्हणून संपूर्ण देशात याची अंमलबजावणी करा अशा सुचना दिल्या. याबाबत मुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव स्थायी समितीने एकमताने मंजूर केला.

उर्वरित प्रश्‍नांवर चर्चा करताना कंत्राटी वाहन चालकांचा पगाराबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत रुग्ण वाहिकांरील चालकांच्या वाढीव मानधनाचा प्रश्‍न गेली अनेक वर्षे चर्चेत होता. यावरुन सभेमध्ये सदस्यांमध्ये खडाजंगीही झाली होती. त्या चालकांना महिन्याला 8 हजार रुपयेच मानधन दिले जात होते. नियमात बदल करुन ते वाढीव कसे मिळेल यासाठी मागील काही महिन्यात प्रयत्न सुरु होते. त्यांना साडेतेरा हजार रुपयांपर्यंत मानधन मिळेल अशी अपेक्षा होती. त्यानुसार प्रशासनाने मार्गही काढला. एप्रिल महिन्याचा त्यांचा वाढीव पगार जमा झाला; मात्र ठेकेदाराकडून अजुनही 742 रुपये पगारात कमी दिले आहेत. ती रक्कमही पूर्ण करावी, तोपर्यंत ठेकेदाराला त्याचे ठरलेले पैसे जिल्हा परिषद देणार नाही असा निर्णय स्थायी समितीने घेतला.