रत्नागिरी बाजारपेठेचे प्रवेशद्वार बंद

पोलिसांची कारवाई; गर्दी टाळण्यासाठी निर्णय

रत्नागिरी:- संचारबंदी असूनही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आणि वाहनांची वर्दळ सुरूच आहे. पोलिस दलाने काही दिवस कारवाई करण्याचे टाळले होते. मात्र आता शहरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी पोलिस दलाने सुरू केली आहे. मुख्य बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी राम आळी, मारूती आळी, पोस्ट ऑफिस आदी बाजारपेठेची सर्व एन्ट्री बॅरिकेटने बंद केली आहेत. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आले आहे.  

कोरोना फैलाव आणि संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अनेक प्रयत्न करत आहेत. मात्र फैलाव आटोक्यात आणण्यास अजून अपेक्षित यश आलेले नाही. जिल्ह्यात काल(ता.11) पुन्हा 622 नवे कोरोना बाधित सापडले तर  एका दिवसात 17 जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभाग आणि प्रशासनाची चिंता वाढविणारे हे आकडे आहेत. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदीही लागू केली आहे. मात्र पोलिसांकडुन त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. तशी नाराजीही मंत्री आणि जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांनी नऊ तारखेपासून शहरीभागात निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.

रत्नागिरी शहरामध्ये सकाळी 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन दिवसभर बाजारपेठेत गर्दी आणि वाहनांची वर्दळ दिसते. दुकानांचे मुख्य शटर बंद आणि मागच्या दाराने वस्तू विकल्या जात असल्याने ही गर्दी दिसते. ते टाळण्यासाठी मुख्य बाजारपेठेची सर्व प्रवेशद्वारे पोलिसांन बॅरिकेटने बंद केली आहेत. त्यामुळे विनाकारण आणि अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली बाजारपेठेत फिरणार्‍या दुचाकीस्वारांवर काहीशी बंधने आली आहे. बाजारेपेठेत होणारी गर्दी कमी झाली आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यात मदत होणार आहे.