आठ दिवसात कोरोनामुक्तीचा टक्का वाढला; बरे होण्याचे प्रमाण 75.20 टक्क्यांवर

रत्नागिरी:-दुसर्‍या लाटेमध्ये वाडी-वस्तीवर कोरोना बाधित सापडत आहेत. बाधितांचा आकडा भितीदायक असला तरीही मागील आठ दिवसांत कोरोनामुक्त होणार्‍यांचा टक्का वाढला आहे. हे दिलासादायक चित्र जिल्ह्यात पहायला मिळत आहे. 30 एप्रिलला 66.70 टक्के बरे होणार्‍याचा दर होता. तो सध्या 75.20 टक्के आहे. हे चिन्ह कोरोनाला उतरती लागल्याचे आहे.

जिल्ह्यात दुसर्‍या लाटेचा प्रभाव मार्चच्या अखेरीस सुरु झाला. शिमगोत्सव, विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रमांसह विविध उत्सावासाठी चाकरमानी गावी परतले. एकमेकांशी संपर्क वाढला आणि कोरोना बाधितांमधील वाढ सुरु झाली. एप्रिलमध्ये शिखर गाठले. एकाच महिन्यात 11 हजार 254 बाधित आढळले. हा जोर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही कायम आहे. 1 ते 9 मे या कालावधीत 4 हजार 678 जणांची नोंद झाली. एप्रिल महिन्यात ऑक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांचा टक्का अधिक होता. या कालावधीत बरे होणार्‍यांची संख्या कमी होऊ लागली होती. एप्रिलच्या अखेरीस हा दर 65 टक्केपर्यंत आला. मागील नऊ दिवसात बरे होणार्‍यांची संख्या वाढू लागली असून उपचाराअंती बाधित घरी परतू लागले आहेत. ताप, सर्दी, खोकला यासारख्या प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकजणांचा रुग्णालयातील उपचार कालावधीही वाढला. सध्या लक्षणे नसलेल्यांना रुग्णालयातून पहिली चाचणी झाल्यानंतर होम आयसोलेशनसाठी पाठवले जात आहे.
शुक्रवारी (ता. 7) आणि शनिवारी (ता. 8) सलग दोन दिवस सहाशेहून अधिक रुग्ण बरे झाले. हे दिलासादायक चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 26 हजार 385 असून त्यातील 19 हजार 843 लोक बरे झाले. उपचाराखाली 5 हजार 751 जणं असून 2 हजार 633 होम आयसोलेशनमध्ये आहेत. बरे होण्याचा दर 75.20 टक्के आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्याचा बरे होण्याचा टक्का राज्याच्या तुलनेत सर्वाधिक होता. तो 95 टक्केपर्यंत पोचला; परंतु दुसर्‍या लाटेत विदारक चित्र निर्माण झाले. मृत्यूचा दर 2.99 टक्के असून आतापर्यंत 791 जणं मृत पावले. एकट्या एप्रिल महिन्यातच चारशे जणांचा मृत्यू झाला. एप्रिलच्या सुरवातीला बरे होण्याचा दर 91.39 टक्के होता. त्यानंतर परिस्थिती बिघडत गेली होती.