प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षमीकरणासाठी 25 कोटीचा आराखडा

नियोजन समितीकडे निधीची मागणी 

रत्नागिरी:-कोरोनातील दुसर्‍या लाटेचा परिणाम सर्वाधिक ग्रामीण भागात होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षमीकरणासाठी 25 कोटीचा आराखडा जिल्हा नियोजनला सादर केला जाणार आहे. कोवीडसाठी ठेवलेल्या 30 टक्के निधीतून आरोग्य केंद्रात प्रत्येकी पाच बेड, 45 नवीन रुग्ण वाहीका यांसह विविध सोयीसुविधा दिल्या जातील, असे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती उदय बने यांनी सांगितले.

श्री. बने यांनी कोरोनातील गंभीर परिस्थितीमध्ये जिल्हा दौर्‍याचे आयोजन करुन ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामीण लोकांना आवश्यक सुविधांची माहिती घेतली आणि त्यानुसार आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी गरज असलेल्या साहित्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे रुग्ण वाडी-वस्तींवर आढळत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात बांधिताना उपचार मिळाले तर बरे होण्याचा दर वाढेल. जिल्हा परिषदेचा स्वतःचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. याबाबत पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह सर्व आमदार यांच्या मार्गदर्शनानुसार हा आराखडा आरोग्य विभाग बनविणार आहे.

जि. प. च्या 67 प्राथमिक आरोग्य केंद्रांना वीस वर्षांपुर्वी रुग्ण वाहिका दिलेल्या होत्या. त्या जुनाट झाल्या असून गावागावात आरोग्य पथके पोचवणे शक्य होत नाही. 67 पैकी 45 रुग्ण वाहिकांची अवस्था बिकट आहेत. त्या नवीन घेण्याचा प्रस्ताव दिला जाईल. सध्या वाडी-वस्तीवरील कोरोना रुग्ण तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी ही वाहने अत्यावश्यक आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना उपचारासाठी आवश्यक बेडस् कमी पडतात. तेथे प्रत्येकी पाच जादा बेडस् देणे, आरोग्य केंद्रात रुग्णहॉल उभारणे या गोष्टी दिल्या जातील. जाकादेवी येथे भव्य रुग्णहॉल बांधला गेला आहे. तेथे लसीकरण मोहीम, रुग्ण तपासणी शिबिर आयोजित करणे शक्य होईल. जेणेकरून नियमित तपासणीत आरोग्य केंद्रांवर भार राहणार नाही, असे बने यांनी सांगितले.