कोरोनाचा बिमोड करण्यासाठी ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ची कडक अंमलबजावणी

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच कोरोनामुळे वाढलेला मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी, कोविडमुक्त रत्नागिरी’ ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा थैमान सुरूच आहे. रुग्णसंख्या थांबता थांबेना, असे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यातच कोरोनामुळे मृत्यूदरदेखील वाढला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने नवी मोहिम हाती घेतली आहे. ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी, कोविडमुक्त रत्नागिरी’ या मोहिमेअंतर्गत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे.

या मोहिमेअंतर्गत कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे व वेळेवर उपचार करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामध्ये गृहभेटी देण्यासाठी एक पथक तयार करण्यात यावे. त्यामध्ये पाच सदस्य असावेत. या पथकामध्ये ग्रामकृतीदल, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीसपाटील आदींचा समावेश असावा. एका पथकात केवळ पाच सदस्य असावेत असे सूचित करण्यात आले आहे.

ग्रामीण भागासोबत शहरी भागातदेखील घरोघरी जाऊन माहिती घेण्यासाठी आरोग्य पथक नियुक्त केले जाणार आहे. त्यानुसार प्रभागाचे नगरसेवक हे पथकाचे अध्यक्ष असतील तर वॉर्ड मेंबर, वसुली कर्मचारी, सफाई मुकादम, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींचा समावेश शहरी भागातील पथकात असेल.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढलेल्या आदेशामध्ये दररोज एक पथक कमीतकमी ५० घरांना भेटी देईल. तसेच या भेटीदरम्यान घरातील सदस्यांची नाव नोंदणी, ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणांची माहिती घेणे, घरातील सर्व सदस्यांची तापमापकाने तापमान घेणे, घरातील व्यक्तींना सहा मिनिटे चालविणे व त्यांचे पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन प्रमाण तपासणे. तसेच ज्या व्यक्तींची ऑक्सिजन लेवल ९५ पेक्षा कमी असल्यास त्यांना नजीकच्या आरोग्य तपासणी केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करून घेणे व त्याचा पाठपुरावा करणे.

या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांनादेखील जिल्हाधिकार्‍यांनी आदेश बजावले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयसोलेशन सेंटरची स्थापना करावी. त्यासाठी एखादा हॉल, हायस्कूल, शाळा इत्यादी ठिकाणी सर्व सुविधा विचारात घेऊन आयसोलेशन सेंटर सुरू करावे.

या मोहिमेदरम्यान कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी या पथकाने जनजागृती करायची असून नागरिकांना सतत मास्कचा वापर तसेच मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन-तीन तासांनी साबणाने हात स्वच्छ धुवावे. प्रवासादरम्यान नाक, तोंड, डोळे यांना हात लावू नये. इतर आजारांची लक्षणे असल्यास कोरोना टेस्ट करून घेणे.

कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांसाठी नवीन आदेश या मोहिमेदरम्यान जारी करण्यात आले आहेत. कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती होमआयसोलेशन अंतर्गत घरी राहणार्‍या किंवा रूग्णालयातून दहा दिवसानंतर सात दिवसांचे होम आयसोलेशनचे निर्देश या आदेशाद्वारे दिले आहेत. तसेच कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींनादेखील विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.