जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण घटून 29.27 टक्क्यांवर 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्याने गेल्या पंधरा दिवसांमध्ये उच्चांक गाठला. 28 एप्रिल रोजी 791 बाधित सापडले. यामुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने घसरले असूून 29.27 टक्क्याने हे प्रमाण घटले आहे. या घटत्या प्रमाणामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.  

22 मार्चपासून जून 2020 पर्यंत कोरोनाची लाट ओसरण्याचे नाव घेत नव्हती. जूननंतर मात्र ती कमी झाली. त्यामुळे डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण कमी प्रमाणात सापडत होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने हा टक्का 95.06 पर्यंत गेला होता. जिल्ह्याला यामुळे मोठा दिलासा मिळाला. सर्व काही पूर्वापार सुरू झाले. त्यानंतर मात्र हळूहळू आणखी काही बाधित मिळू लागले. 21 डिसेंबर 2020 ला तर रुग्ण संख्या वाढल्याने हा टक्का 94.83 पर्यंत खाली घसरला. 1 जानेवारी 2021 मध्येही काहीसा दिलासा मिळाला. टक्का पुन्हा वाढून फेब्रुवारी 2021 पर्यंत 95.15 टक्केवर गेला.
वर्षाने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जिल्ह्यात कहर सुरू झाला. फेब्रुवारीपासून हे प्रमाण घसरण्यास सुरवात झाली. तेव्हा 94.64 टक्के रुग्ण बरे होत होते. मार्चपर्यंत हे प्रमाण असेच राहिले. परंतु एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. रुग्णसंख्या वाढल्याने हे प्रमाण 84.47 टक्क्यापर्यंत खाली आले. 16 एप्रिलपर्यंत तर हे प्रमाण एवढे घसरले की, 78.90 पर्यंत खाली आले. रुग्णसंख्या वाढल्याने रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 65.79 टक्के म्हणजे गेल्या सहा महिन्यानंतर 29.27 टक्केने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्याच्यादृष्टीने ही चिंतेची बाब आहे.