जिल्ह्यातील सहा हजार कामगारांना मिळणार 1500 रुपयांची आर्थिक मदत 

रत्नागिरी:- संचारबंदीच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेक बांधकाम कामगारांचे हाल होण्याच्या शक्यतेने शासनाने त्यांना 1500 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात कामगार कल्याण विभागाकडे अशा प्रकारच्या नोंदणीकृत कामगारांची संख्या 6 हजार आहे. या सहा हजार कामगारांना शासनाच्या या मदतीचा लाभ होणार आहे. त्यासाठी माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 6 हजार घरेलू कामगारांना संचारबंदी काळात 1500 रुपयेची आर्थिक मदत मिळणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा सर्वसामान्य भरडला जाणार, असा आरोप विरोधकांकडून होत होता. त्यांची व्यवस्था करूनच संचारबंदीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत होती. त्यामुळे शासनाने संचारबंदी लागू करण्यापूर्वी परमिटधारक रिक्षा व्यावसायिक, नोंदणीकृत घरेलू कामगार आणि फिरता परवाना असलेल्या हातगाडीधारकांना आर्थिक मदत करण्याच्यादृष्टीने निर्णय घेण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांच्याकडून सुमारे 10 हजार परमिटधारक रिक्षा व्यावसायिकांची यादी मागविण्यात आली आहे.

तसेच येथील कामगार कल्याण कार्यालयाकडून बांधकाम व्यावसायिक असलेल्या कामगारांच्या नोंदीची माहिती घेण्यात आली. हे कामगारदेखील रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे संचारबंदीच्या काळात त्यांचा रोजगार जाणार असल्याने किमान अन्नधान्य खरेदीसाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून 1500 रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. कामगार कल्याण विभागाकडे नोंदणीकृत कामगारांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात 6 हजार नोंदणीकृत कामगार असून त्यांच्या बँक खात्यात काही दिवसात 1500 रुपये पडणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती कामगार कल्याण विभागाकडून देण्यात आली.