वरवडेतील नुकसानीची खारलँडच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी; 115 माड गेले पाण्याखाली 

रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथील बंधाऱ्याच्या अर्धवट झालेल्या कामामुळे भरतीचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने ग्रामस्थांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर खारलँड विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. गुरुवारी सकाळी अधिकाऱ्यांनी माजी सरपंच निखिल बोरकर यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत पंचयादी घातली. यात 100 पेक्षा अधिक माडाची झाडे तसेच केळी आणि आंबा कलमांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  यावेळी बंधाऱ्यावरील उघडण्यात आलेली मोरी तात्काळ बंद करण्यात येईल असे सांगितले.  

तालुक्यातील वरवडे येथील खारलँड बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून काम घेतलेला ठेकेदार गायब झाला. अर्धवट अवस्थेतील कामामुळे भरतीचे पाणी थेट रहिवासी भागात शिरले. मंगळवारी पहाटे भरतीचे पाणी ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोचल्याने एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांच्या वयक्तिक मालमत्तेचे यामुळे नुकसान झाले. यामध्ये संतोष सत्यवान पाटील यांचे 30 माड, शंकर बोरकर यांचे 25, महानंदा बोरकर यांचे 40 माड, संदीप बोरकर यांचे 20 माड आणि मयूर राणे यांनी केळीची झाडे पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले. रहिवासी भागत पाणी भरल्याने रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने संबंधित ठेकेदार आणि खारलँड विभागाने तातडीने हे काम हाती न घेतल्यास प्रसंगी आंदोलन छेडू असा इशारा येथील माजी सरपंच निखिल बोरकर यांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर खारलँड विभागाचे श्री गमरे आणि श्री चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. भरतीचे पाणी भरल्याने झालेल्या नुकसानीची पंचयादी घालण्यात आली. बंधाऱ्याची मोरी तात्काळ बंद करण्यात येईल असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.