लोटे एसआयडीसीतील एम.आर. फार्मा कंपनीत स्फोट

खेड:- खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत आज पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. औद्योगिक वसाहतीमधील एम. आर. फार्मा कंपनीत स्फोट होऊन आग लागली असून आज (दि.२८) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल होऊन तब्बल ३ तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.

घटनास्थळावरुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार प्रदीप जैन यांच्या मालकीची ही कंपनी असून त्यामध्ये केमिकल निर्मिती केली जाते. सकाळी अकराच्या सुमारास कंपनीमध्ये केमिकल प्रक्रीया सुरु असताना रियाक्टरचा अचानक स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली त्यानंतर केमिकलने भरलेले प्लॅस्टिक ड्रमने एका मागोमाग एक पेट घेतला यामुळे भीषण आग लागली. या आगीचे लोट महामार्गा वर दिसून येत होते या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

कंपनी मधील ड्रमने पेट घेतल्या नंतर ड्युटीवर असलेल्या कामगारांनी जीवाची पर्वा न करता घटना स्थळांवरून काढता पाय घेतल्याने त्यांचा जीव बचावला, अन्यथा पुन्हा अनर्थ घडला असता. या आगीची माहिती औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दल व खेड न प च्या अग्निशमन दलाच्या जवानांसह मदतग्रुपला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तब्बल ३ तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीमध्ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नसून, मोठ्या प्रमाणात वित्तहानी मात्र झाली आहे.