सकारात्मक; जिल्ह्यात 24 दिवसात 2 हजार 932 जण कोरोनामुक्त 

रत्नागिरीः– कोरोना महामारीने जिल्ह्यात थैमान घातले आहे. एप्रिल महिना कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला आहे. गेल्या 24 दिवसात 7 हजार 480 नवे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. परंतु त्यातील 2,932 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रुग्ण बरा होण्याचा दर 39 टक्यांवर स्थिर राहिला आहे. तर 4 हजार 548 रुग्ण सरकारी, खाजगी रुग्णालयासह घरी उपचाराखाली आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला. मंडणगड वगळता उर्वरीत आठ तालुक्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. दिवसाला 500 च्या पुढे रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. तर मृत्यूच्या प्रमाणातहि वाढ होत आहे. असे असले तरीहि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणहि 39 टक्के आहे. दि.1 ते 24 एप्रिल या कालावधीत 7 हजार 480 रुग्ण नव्याने सापडले. त्यातील 2 हजार 932 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 4 हजार 548 रुग्ण सरकारी, खाजगी रुग्णालयासह घरी उपचाराखाली आहेत. सध्या कोरोना मुक्तीचा दर महिनाभरात 39 टक्के आहे.

महिनाभरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी रुग्णालये अपूरी पडू लागल्याने आता तालुकास्तरावर कोरोना सेंटर सुरु करण्यात आली आहे. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना त्यांच्या घरीच विलगिकरणात ठेवण्यात येत असल्याने घरगूती वातावरण त्यांना बरे होण्यासाठी पोषक ठरत आहे.

अनेक रुग्ण पॉझिटिव्ह असतानाही काही घरीच राहत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यवर परिणाम होवून त्यांची प्रकृती चिंताजण होत आहे. यासाठी पुर्वी प्रमाणे घरोघरी शोध मोहिम राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तरच कोरोनाचा फैलव रोखणे शक्य होणार आहे.