खासगी लसीकरण प्रकरणी गुन्हा दाखल करा: अनिकेत पटवर्धन

रत्नागिरी:- शहरात शनिवारी (ता.24) झालेले खासगी लसीकरण शिबिर अधिकार्‍यांना भोवण्याची चिन्हे आहेत. अधिकार्‍यांसह एका राजकीय पक्षाचे शहरप्रमुख व पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आता लसीकरणाचा विषय मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते व आरोग्य मंत्र्यांपर्यंत गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात भाजयुमाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यामार्फत तक्रार दिली आहे. त्याचप्रमाणे आमदार प्रसाद लाड तथा भाजपचे उपाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात लसीकरण नियमावलीचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. 24 एप्रिलला मंगल कार्यालयात एका राजकीय पक्षाच्या शहरप्रमुखांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून एका वॉर्डमधील 200 नागरिकांना लसीकरण केले. संबंधित नागरिकांनी कोणत्याही प्रकारची ऑनलाईन नोंदणी केलेली नव्हती. या केंद्राला प्रशासनाने कसलीही लेखी परवानगी दिलेली नाही. ज्यांनी नोंदणी केली होती त्यांना त्या दिवशी लसीकरण केंद्रात जाऊन लस मिळाली नाही. कोरोना नियमाचे उल्लंघन केले गेलेले असून त्यामुळे अधिकार्‍यानी अधिकाराचा गैरवापर करत नियमबाह्य लसीकरण केले, असे म्हटले आहे.