ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमाकडे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पाठ

रत्नागिरी:- कोरोनाकाळात ऑनलाईन अध्यापन सुरू होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील खंड भरून काढण्यासाठी राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन स्वाध्याय उपक्रम व्हॉटस्अ‍ॅपद्वारे राबविण्यात आला. मात्र त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून प्रतिसाद कमी लाभला. राज्यात रत्नागिरी जिल्हा 28 व्या क्रमांकावर असून या उपक्रमात अवघे 4.40 टक्के विद्यार्थीच सहभागी झाले होते.

शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी पायाभूत साक्षरता व संख्या वाढीसाठी ऑनलाईन स्वाध्याय उपक्रम राबविण्यात आला. शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रमातंर्गत शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी विविध कायक्रम राबविले. त्यात ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीचा अवलंब केला होता. शाळा बंद असली तरीही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते. स्वाध्याय उपक्रम मात्र युडायस कोडशी जोडण्यात आला होता. शिक्षक स्वत:च्या शाळेतील, वर्गातील विद्यार्थ्यांची कामगिरी पाहताना विद्यार्थ्यांना मदत करीत होते. शिक्षण विभागाने सहा महिन्यांपुर्वी ऑनलाईन शिक्षणासाठी स्वाध्याय उपक्रम हाती घेतला. व्हॉटस्अ‍ॅप नंबर माध्यमिक व प्राथमिक शाळांना दिला होता. त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रश्नावली देऊन ती सोडविण्यासाठी प्रवृत्त केले. हा अभ्यास घेतानाच प्रश्नांचा सराव दर दिवशी करून घेण्यात आला. जिल्ह्यात एक ते दहावी पर्यंतचे दोन लाख पाच हजार विद्यार्थी आहेत. सुरूवातीला अवघे 2300 विद्यार्थी नोंदले गेले. प्रचार, प्रसारानंतर 23 हजार विद्यार्थ्यांनी उपक्रमात भाग घेतला. मोबाईल व्हॉट्सपद्वारे विद्यार्थ्यांना सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून दिला गेला. पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजुषा घरच्या घरी उपलब्ध करून दिली. जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा असल्याने मोबाईल रेंजची समस्या आहे. शिवाय मोबाईल वापरणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या इयत्ता आठवी ते बारावी मधील आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमाचा लाभ घेणे अशक्य झाले होते.